Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 08:47 PM2021-05-17T20:47:46+5:302021-05-17T20:59:07+5:30

Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Cyclone Tauktae : CM Uddhav Thackeray is closely monitoring the CycloneTauktae situation in the State | Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना

Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदत कार्य वेगाने सुरु ठेवण्याच्या सूचना

Next
ठळक मुद्देचक्रीवादळामुळे एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. तर जवळपास १२ हजार ५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

मुंबई: तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला. तसेच, या चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या चक्रीवादळामुळे एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. तर जवळपास १२ हजार ५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

याचबरोबर, समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही, त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. तसेच, रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. याशिवाय, मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

कालपासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता. संध्याकाळनंतर तौत्के चक्रीवादळ किनाऱ्यालगत येऊ लागले तसतसे विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागात जोरदार पाऊस, वादळी वारे वाहू लागले तसेच मुंबईत देखील त्याचा परिणाम जाणवू लागला होता. पहाटेपासून तर दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरातही जोरदार वारे तसेच मुसळधार पाऊस सुरु झाला. मुंबई महानगरपालिकेने आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर लक्ष ठेवले होते तसेच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली.

२ हजार ५४२ बांधकामांची  पडझड
या चक्रीवादळामुळे २ हजार ५४२ घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा ६ अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे. ठाणे जिल्ह्यात २, रायगड ३, सिंधुदुर्ग १ असे ६ जण मरण पावले आहेत. मुंबईत ४ , रायगड आणि रत्नागिरीत प्रत्येकी २ आणि ठाण्यात १ व्यक्ती जखमी आहे. रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी २ अशी ४ जनावरे मरण पावली आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सातत्याने माहिती घेत आहेत.

(Cyclone Tauktae : ठाण्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पडझड, जनजीवन विस्कळीत)

मुख्यमंत्र्यांची डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी चर्चा
मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ कृष्णानंद होसाळीकर यांच्याशीही चर्चा केली. आज (सायंकाळी 5 वाजेच्या स्थितीनुसार ) हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून समुद्रात 180 किमी दूर असून दिवसभर असणारा वाऱ्याचा वेगही हळूहळू कमी होऊन 70 ते 80 किमी प्रती तास इतका होईल पुढे तो आणखी ओसरेल असे त्यांनी सांगितले. हे चक्रीवादळ आज रात्री 8 ते 11 पर्यंत गुजरातेत धडकेल. त्यावेळी तेथील वाऱ्याचा वेग हा पावणे दोनशी किमी प्रती तास इतका असू शकतो. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागेल असेही त्यांनी सांगितले. गेल्या 6 तासांत मुंबई उपनगरात 120 मिमी पेक्षा जास्त तर कुलाबा भागात 100 ते 120 मिमी पाऊस झाल्याची माहिती त्यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली
मुंबईत ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे तसेच मुंबईत पडलेली झाडे व खांब काढण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली. चक्रीवादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली, तसेच रेल्वे वाहतुकीवर झालेल्या परिणामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांकडून घेतली.

Web Title: Cyclone Tauktae : CM Uddhav Thackeray is closely monitoring the CycloneTauktae situation in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.