''वायू'' चक्रीवादळ उद्या गुजरातला धडकणार : कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:54 PM2019-06-12T20:54:01+5:302019-06-12T20:57:40+5:30
अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ हे गुरुवारी दुपारी द्वारका आणि वेरावळ दरम्यान धडकण्याची शक्यता आहे़.
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ हे गुरुवारी दुपारी द्वारका आणि वेरावळ दरम्यान धडकण्याची शक्यता आहे़. या वादळामुळे सौराष्ट्र, कच्छ किनारपट्टी, गीर, अमरीली, सोमनाथ, डियु, जुनागड,पोरबंदर, राजकोट, जामनगर, देवभूमी, द्वारका आणि कच्छ या भागात त्याचामोठा दुष्परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे़.
‘वायू’ चक्रीवादळामुळे कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी १३ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून सौराष्ट्र, कच्छ भागात जोरदार ते अतिवृष्टीहोण्याची शक्यता आहे़. दक्षिण गुजरात भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ . ‘वायू’ चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता वेरावळपासून २८० किमीतर पोरबंदरपासून ३६० आणि मुंबईपासून ३१० किमी अंतरावर होते़. हे चक्रीवादळ ताशी १४ किमी वेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकरत आहे़. या चक्रीवादळाचा सध्या ताशी १४० ते १५० किमी वेगाने वाहत आहे़. हे चक्रीवादळ जेव्हा गुजरातला धडकेल, तेव्हा या वादळाचा वेग ताशी १५५ ते १६५ किमी असण्याची शक्यता आहे़. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
‘वायू’ चक्रीवादळामुळे गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ मार्गोवा ५१, देवगड ३४, ओझर ११, महाबळेश्वर ९ मिमी पावसाची नोंद झाली होती़. बुधवारी सांयकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबई १३, अलिबाग ११, रत्नागिरी ४५, पणजी ३०, डहाणु ६, महाबळेश्वर १८, पुणे, लोहगाव, सातारा येथे प्रत्येकी २ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.
इशारा : १३ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाशी शक्यता़ विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट तर बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट़ १४ जून रोजी मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़.
१५ व १६ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. असून विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.