सिलिंडर स्फोट : कर्जाच्या रकमेसह हिरव्या स्वप्नांची राखरांगोळी
By admin | Published: April 23, 2016 05:00 AM2016-04-23T05:00:07+5:302016-04-23T05:00:07+5:30
दुष्काळाशी लढतांना शेतीसाठी बॅँकेतून कर्जाची रक्कम काढून घरी आणावी आणि सिलिंडरचा स्फोटात या रकमेसह संसारपयोगी वस्तूच्या क्षणार्धात चिंधड्या उडाव्यात.
अवर्षणग्रस्त शेतकऱ्यावर आभाळ कोसळले
शैलेश कर्पे. सिन्नर (जि.नाशिक)
दुष्काळाशी लढतांना शेतीसाठी बॅँकेतून कर्जाची रक्कम काढून घरी आणावी आणि सिलिंडरचा स्फोटात या रकमेसह संसारपयोगी वस्तूच्या क्षणार्धात चिंधड्या उडाव्यात...यापेक्षा आभाळ ते काय कोसळणार? सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी घर, अन्न-धान्य आणि संसारपयोगी वस्तूंची राखरांगोळी डोळ्याने पाहण्याचा दुर्देवी प्रसंग सिन्नर तालुक्यातल्या अवर्षणग्रस्त शेतकऱ्याच्या नशिबी आला आहे. कर्जाचा आधारही नियतीने हिरावून नेल्याने हिरवे स्वप्नही कोमोजून गेले. खडांगळी येथील रामनाथ त्र्यंबक कोकाटे या शेतकऱ्याच्या घरी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. कोकाटे कुटुंबिय बाहेरगावी होते. त्यामुळे जीवितहानी टळली. घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सिलिंडरच्या स्फोटाने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
निमगाव-देवपूर शिवारात कोकाटे यांची वस्ती आहे. पाण्याची परिस्थिती जेमतेम. अशा परिस्थितीत कोकाटे यांची शेती जगविण्यासाठी धडपड सुरु आहे. कोकाटे यांनी गुळवंच येथील आयडीबीआय बॅँकेतून कर्जाची रक्कम काढून घरातील कपाटात ठेवली होती.शुक्रवारी सकाळी कोकाटे कुटुंबीय पुतणीच्या मुळाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी सिलिंडरचा स्फोट झाला आणि घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सिलिंडरचे तुकडे सुमारे शंभर फूटावर जावून पडले.
कोकाटे यांनी कपाटात १ लाख २० हजारांची रक्कम ठेवली होती. स्फोटात कपाटाच्याही चिंधड्या उडाल्या. त्यातील १ लाख २० हजाराची रक्कमही जळून खाक झाली. पंचनाम्यात सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
चौकट-
शिलाई मशिनही नेस्तनाबूत
कोकाटे यांची पत्नी उर्मिला या शिवणकाम करतात. स्फोटात दोन शिलाई मशीन्स व पीको फॉलचे मशिनही नेस्तनाबूत झाले. स्फोटाने उपजीविकेचेही साधन गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कोकाटे यांचा मुलगा रोहित आभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. त्याची महत्त्वाची कागदपत्रेही जळून खाक झाली. कोकाटे यांच्याकडे केवळ अंगावरचे कपडे सोडून अन्य कोणतेही संसारपयोगी साहित्य उरले नाही.