Cyrus Mistry Accident: “सायरस मिस्त्रींचे निधन धक्कादायक, असं काही घडेल यावर विश्वासच बसत नाही”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 09:12 PM2022-09-04T21:12:29+5:302022-09-04T21:13:06+5:30
Cyrus Mistry Accident Latest News & Updates: सायरस मिस्त्रींनी नेहमीच देशाच्या विकासासाठी भरीव कामगिरी करत मोलाचे योगदान दिले, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Cyrus Mistry: प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे पालघरच्या चारोटी येथील ब्रिजवर अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. केवळ उद्योजगतातून नव्हे, तर राजकीय नेतेमंडळीही सायरस मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक असून, असे काही घडेल यावर विश्वासच बसत नाही, असे सांगत तीव्र शोक व्यक्त केला आहे.
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाची बातमी धक्कादायक आहे. असे काही घडेल यावर विश्वासच बसत नाहीये. देशाच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. प्रसिद्धीपासून दूर राहिलेले सायरस मिस्त्रींनी नेहमीच देशासाठी भरीव कामगिरी केली आहे. रतन टाटांनंतर टाटा समूहाचे अध्यक्षपद सायसर मिस्त्रींकडे आले. सायरस मिस्त्री हे मितभाषी, अधिक कष्ट करणारे आणि व्यवसायात त्यांचे बारकाईने लक्ष होते. या देशातील अनेक प्रकल्पात सायरस मिस्त्री आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. गेल्या काही वर्षामध्ये मिस्त्री यांच्या कुटुंबाला अनेक धक्के बसले आहेत. संकटाची मालिका या मिस्त्री घरावर सुरु असल्याचे दिसतेय. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यास मदत करो, या शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारतीय उद्योग जगताची मोठी हानी
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही सायरस मिस्त्री यांच्या निधानावर शोक व्यक्त केला. टाटा सन्सचे माजी प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनानं भारतीय उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. भारतानं एक महान सुपुत्र गमावला आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी वेगळी छाप उमटवली होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ सायरस यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात एकूण दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला येत होते. सूर्या नदीवरील नवीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने धोकादायक डिव्हायडरला कार धडकली, अशी माहिती देण्यात आली आहे.