डी.एड्. कॉलेजचे वर्ग रिकामे

By admin | Published: July 1, 2015 11:18 PM2015-07-01T23:18:37+5:302015-07-02T00:24:02+5:30

विद्यार्थ्यांअभावी १0 महाविद्यालये बंद : जागा १७१८, अर्ज मात्र ४९७ -- लोकमत विशेष

D. Ad College classes empty | डी.एड्. कॉलेजचे वर्ग रिकामे

डी.एड्. कॉलेजचे वर्ग रिकामे

Next

अशोक डोंबाळे - सांगली
जिल्ह्यात सहा अनुदानित आणि २९ खासगी अशी ३५ अध्यापक (डी.एड्.) महाविद्यालये आहेत. त्यात १७१८ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, यंदा केवळ ४९६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत! उर्वरित १२२२ जागा शिल्लक राहणार असल्यामुळे अनेक महाविद्यालयांना कुलूप लागणार आहे. गेल्यावर्षी विद्यार्थीच मिळाले नसल्याने दहा महाविद्यालये बंद झाली आहेत. भावी गुरुजींचे वर्ग यंदाही रिकामेच राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

डी.एड्.ला प्रवेश मिळविण्यासाठी मागील आठ-दहा वर्षांमध्ये गर्दी होती. सांगली जिल्ह्यात पाच ते सात हजार अर्जांची विक्री होऊन तेवढेच विद्यार्थी प्रवेशासाठीही गर्दी करीत. मात्र प्राथमिक शाळांमध्ये नोकरीच मिळत नसल्याने गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांनी डी.एड्.कडे पाठ फिरवली आहे. शासनाने शिक्षकांच्या नोकरीसाठी पात्रता परीक्षा (सीईटी) सुरू केली आहे. जिल्हा परिषदेकडील दहा ते पंधरा शाळा दरवर्षी बंद होत आहेत. नव्याने नोकरभरती थांबली आहे. यामुळे तरुणांचा डी.एड्.कडे प्रवेशाचा कल कमी झाला आहे. परिणामी डी. एड्. महाविद्यालये बंद पडू लागली आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित अशा ३५ महाविद्यालयांमध्ये १७१८ विद्यार्थी क्षमता होती. मात्र केवळ ६५० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. अनेक महाविद्यालयांत केवळ चार ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश होते. परिणामी दहा महाविद्यालये बंद पडली. तेथील काही शिक्षकांना घरी जावे लागले, तर काहींना त्याच संस्थेत सामावून घेतले आहे. यंदा १७१८ विद्यार्थ्यांची क्षमता आहे, पण केवळ ४९६ विद्यार्थ्यांनीच अर्ज केल्यामुळे उर्वरित १२२२ जागा रिक्त राहाणार आहेत. यावर्षी पुन्हा दहा ते पंधरा डी.एड्. महाविद्यालयांना कुलूप ठोकावे लागणार आहे. यामुळे नव्याने चाळीस ते पन्नास शिक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.



विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू
शासनाच्या नियमानुसार डी.एड. महाविद्यालयांत प्रवेश घेण्याची पहिली फेरी दि. ३० जूनपासून सुरु झाली आहे. परंतु, विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला नाही. यामुळे यावर्षी ४९६ अर्ज नेलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्व प्रवेश घेतील की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली आहे.


२०१० पासून शिक्षकांची नोकरभरती पूर्ण थांबली आहे. शिवाय, राज्य शासनाने नोकरीसाठीची पात्रता परीक्षा सुरू केली आहे. या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा डी.एड्. अभ्यासक्रमाकडील कल आता कमी होत आहे. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
- पी. व्ही. जाधव, प्राचार्य,
अध्यापक विद्यालय, सांगली.

Web Title: D. Ad College classes empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.