डीजी यादव यांनीही ‘फेअरवेल’कडे फिरविली पाठ...हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 08:31 PM2018-09-30T20:31:17+5:302018-09-30T20:31:42+5:30
राज्य पोलीस दलातील न्यायवैधक व विधि विभागाचे (एफएसएल) महासचालक एस. पी. यादव हे रविवारी सेवानिवृत्त झाले. प्रथेप्रमाणे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) असोसिएशनकडून दिला जाणारा निरोप (फेअरवेल) नाकारून, राज्य सरकारवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.
मुंबई : राज्य पोलीस दलातील न्यायवैधक व विधि विभागाचे (एफएसएल) महासचालक एस. पी. यादव हे रविवारी सेवानिवृत्त झाले. प्रथेप्रमाणे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) असोसिएशनकडून दिला जाणारा निरोप (फेअरवेल) नाकारून, राज्य सरकारवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. सहकाऱ्यांकडून निवृत्तीपर शुभेच्छा नाकारणारे यादव हे गेल्या पावणे दोन वर्षात रिटायर झालेल्या पाच यापैकी चौथे डीजी दर्जाचे अधिकारी आहेत. सेवाज्येष्ठतेचा विचार न करता, साइड पोस्टिंग देऊन दुर्लक्षित ठेवल्याने त्यांनी निषेधाचा सुर व्यक्त केला आहे. माजी पोलीस आयुक्त राकेश मारियापासून ते यादवापर्यंतची ही यादी आहे.
पोलीस दलातून निवृत्त होणाºया अधिकाऱ्यांना आयपीएस असोसिएशनकडून वरळी येथील अधिकाऱ्यासाठी निवासस्थान (मेस) मध्ये सत्कार व जेवणाचा कार्यक्रम ठेवला जातो. या वेळी संबंधित व अन्य अति वरिष्ठ अधिकारी आठवणी सांगून नवीन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. मात्र, गेल्या पावणेदोन वर्षांत निवृत्त झालेल्या सतीश माथूर वगळता चार अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली आहे. त्यामध्ये राकेश मारिया, प्रभात रंजन, व्ही.डी. मिश्रा आणि रविवारी रिटायर झालेले यादव यांचा समावेश आहे. सत्कार न स्वीकारण्यामागे विविध कारणे सांगितली असली, तरी मुख्य निमित्त हे सरकार आणि काही सहकाऱ्यांबद्दल असलेली नाराजी हेच आहे. त्यातून पोलीस दलातील सुप्त नाराजी उघड होत असून, खात्यासाठी घातक ठरणारी आहे.
एसपी यादव हे १९८६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून गेल्या जवळपास पावणे दोन वर्षापासून ‘एफएसएल’ चे महासंचालक होते. मुंबईचे आयुक्तपद नाही तर किमान एसीबीचे प्रमुखपद दिले जाईल, अशी त्यांची इच्छा होती, मात्र सरकारने सलग २५ महिने पद रिक्त ठेवल्यानंतर गेल्या आठवड्यात त्या ठिकाणी त्यांच्यापेक्षा ज्यूनियर असलेल्या संजय बर्वे यांची नियुक्ती केली. त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जाते.
राज्यात सध्या डीजी दर्जाची सात पदे मंजूर असून यादव रिटायर झाल्याने ‘एफएसएल’ आणि सुरक्षा महामंडळ ही पदे रिक्त झाली असून त्यासाठी डी. कनकरत्नम हे पात्र असून दोघेही १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. मात्र सरकारने केवळ एक पद भरण्याचा निर्णय घेतल्यास नागराळे यांना पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या निवृत्तीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
थेटपणे कारण टाळले....
‘फेअरवेल’ नाकारण्याबाबत विचारणा केली असता एस.पी.यादव यांनी थेटपणे काहीही भाष्य करण्याचे टाळले. तर असोसिएशनचे पदसिद्ध सचिव असलेले आस्थापना विभागातील विशेष महानिरीक्षक राजकुमार व्हटकर म्हणाले, ‘अन्य कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविले होते.’