डी. के. जैन मुख्य सचिव, सुमित मलिक यांच्याकडून सूत्रे स्वीकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 05:49 AM2018-05-01T05:49:37+5:302018-05-01T05:49:37+5:30
राज्याच्या मुख्य सचिवपदी डी. के. जैन यांची नियुक्ती झाली असून, सोमवारी मावळते मुख्य सचिव सुमित मलिक यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी डी. के. जैन यांची नियुक्ती झाली असून, सोमवारी मावळते मुख्य सचिव सुमित मलिक यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
१९८३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले जैन हे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहात होते. मुख्य सचिव म्हणून त्यांना नऊ महिन्यांचा कालावधी मिळेल. ३१ जानेवारी २०१९ रोजी ते सेवानिवृत्त होतील. जैन हेच नवे मुख्य सचिव होतील, असे वृत्त ‘लोकमत’ने १२ एप्रिलच्या अंकात दिले होते.
अतिरिक्त मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) मेधा गाडगीळ आणि अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव (गृह) हे जैन यांच्यापेक्षा ज्येष्ठ अधिकारी असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन यांना पसंती दिली.
सेवाज्येष्ठता डावलली गेल्यामुळे श्रीवास्तव नारज असल्याचे समजते. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये केलेले कार्य, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी उचललेली पावले या बाबींमुळे जैन यांच्या नावास पसंती दिली गेली, असे म्हटले जाते.
कृषी क्षेत्राला प्राधान्य
कृषी क्षेत्रातील उत्पादन दुप्पट करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आपण प्रशासकीय पातळीवर आखू. राज्याचे प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाईल.
- डी. के. जैन, नवे मुख्य सचिव.