डी. वाय. पाटील यांचे नातू पार्थ पवार यांच्या प्रचारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 05:58 PM2019-04-25T17:58:21+5:302019-04-25T18:11:21+5:30
कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि ग्रुपचे विश्वस्त युवानेते ऋतुराज संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचा बुधवारी (दि. २४) प्रचार केला. वाकड (जि. पुणे) परिसरात पार्थ यांच्याबरोबर ‘रोड शो’मध्ये ऋतुराज हे सहभागी झाले.
कोल्हापूर : येथील डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि ग्रुपचे विश्वस्त युवानेते ऋतुराज संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचा बुधवारी (दि. २४) प्रचार केला. वाकड (जि. पुणे) परिसरात पार्थ यांच्याबरोबर ‘रोड शो’मध्ये ऋतुराज हे सहभागी झाले.
डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीय आणि शरद पवार कुटुंबीय यांचे तीन पिढ्यांपासूनचे संबंध आहेत. पवार कुटुंबातील पार्थ आणि रोहित यांच्याशी ऋतुराज यांची घनिष्ठ मैत्री आहे. ऋतुराज यांच्या विवाह सोहळ्यातील विविध कार्यक्रमात पार्थ आणि रोहित उत्साहाने दोन दिवस सहभागी झाले होते.
मैत्रीचे नाते असल्याने ऋतुराज हे पार्थ यांच्या प्रचारात सहभागी झाले. पिंपरी चिंचवडमधील रॅली आणि वाकडमधील ‘रोड-शो’मध्ये ते सहभागी झाले. त्यांनी काही बैठका घेतल्या. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये ऋतुराज यांनी ‘आमचं ठरलंय’ अशी भूमिका घेतली होती. वाकडमधील ‘रोड शो’मध्ये सहभागी होऊन त्यांनी कोल्हापूरची भरपाई मावळमध्ये केली असल्याची चर्चा आहे.
आमचे आणि पवार कुटुंबासमवेत पूर्वीपासूनचे संबंध आहेत. पार्थ हे माझे वर्गमित्र आहेत. त्यांच्या प्रचाराबाबत रोहित आणि पार्थ यांच्यासमवेत माझे मोबाईलवरून बोलणे होत होते; मात्र, काही कामानिमित्त बिझी असल्याने मला त्या ठिकाणी प्रचाराकरिता जाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. कोल्हापुरातील काम पूर्ण झाल्याने बुधवारी पिंपरी-चिंचवड, वाकड या परिसरात पार्थ यांच्या प्रचारात सहभागी झालो. पुणे येथे डी. वाय. पाटील ग्रुपच्या शैक्षणिक संस्थांतील कर्मचारी, विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याअनुषंगाने प्रचारासाठी त्या ठिकाणी गेलो. कोल्हापूरचे स्थानिक संदर्भ वेगळे होते. माझी भूमिका स्पष्ट होती; त्यामुळे कोल्हापूरची भरपाई मावळमध्ये करण्याचा मुद्दा नाही.
- ऋतुराज पाटील