डी. वाय. पाटील यांना डी. लिट
By admin | Published: December 24, 2014 12:53 AM2014-12-24T00:53:57+5:302014-12-24T00:54:25+5:30
बहुमताने ठराव : शिवाजी विद्यापीठाचा निर्णय
कोल्हापूर : माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची डी. लिट. ही मानद पदवी देण्याचा निर्णय आज, मंगळवारी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत घेण्यात आला. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या अधिसभेत ७५ विरुद्ध ८ अशा बहुमतांनी डॉ. पाटील यांना डी. लिट. देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.
प्राचार्य डॉ. डी. आर मोरे यांनी डी. लिट. पदवीसाठी डॉ. पाटील यांच्या नावाचा ठराव अधिसभेसमोर मांडला. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) डॉ. पाटील यांना डी. लिट. देण्याच्या ठरावाबाबत अनेक कायदेशीर त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी ठराव मागे घ्यावा, अशी मागणी केली. ‘सुटा’चे डॉ. आर. एच. पाटील म्हणाले, डी.लिट. पदवी केवळ व्यक्तीलाच देता येते. पदाला देता येत नाही. डॉ. डी. वाय. पाटील, राज्यपाल, बिहार अशा पदनामासह किंबहुना पदावर असणाऱ्या व्यक्तीला डी. लिट. देण्याचा प्रस्ताव अधिसभेसमोर ठेवणे चुकीचे आहे.
डॉ. सविता धोंगडे म्हणाल्या, डॉ. डी. वाय. पाटील, राज्यपाल, बिहार अशा उल्लेखाचा प्रस्ताव कुलपती महोदयांकडे कुलगुरूंनी पाठविला आहे. कुलपतींनी मान्यता दिलेल्या प्रस्तावात डॉ. डी. वाय. पाटील, राज्यपाल, बिहार अशा नावाचा आहे. याच नावास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली असून, याच नावास पदनामासह मान्यता द्यावी, असा प्रस्ताव सिनेटसमोर ठेवला आहे. विद्यापीठाच्या इतिहासात अशाप्रकारे पदनामासह आतापर्यंत कोणालाही पदवी दिलेली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ही ऐतिहासिक चूक केलेली आहे. सिनेट ही पूर्णत: तांत्रिक स्वरूपात चालत असल्याने व वरील सर्व तांत्रिक बाबी विचारात घेता पाटील यांना डी.लिट. देण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा. यावर प्रशासकीय बाजू मांडताना ‘बीसीयुडी’चे संचालक डॉ. अर्जुन राजगे म्हणाले, विद्यापीठाने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. सर्वांचे मार्गदर्शन घेऊनच हा प्रस्ताव तयार करून कुलपती कार्यालयाकडे पाठविला. त्यांना जेव्हा डी.लिट देण्याचा प्रस्ताव होता तेव्हा ते राज्यपाल होते. त्यानंतर कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी सर्व तांत्रिकबाबी तपासूनच प्रस्ताव तयार केला असून तो योग्य असल्याचे सभागृहाला सांगितले. राजगे यांचे स्पष्टीकरण केल्यानंतरही सदस्यांचे समाधान न झाल्याने ठरावाबाबत मतदान घेण्याचा निर्णय झाला. यात डॉ. पाटील यांना डी.लिट. द्यावी, यासाठी ७५ जणांनी हात उंचावून सहमती दिली. याप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. अशोक भोईटे, प्रभारी कुलसचिव सी. एस. कोतमिरे यांच्यासह अधिसभा सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)