मराठा आरक्षणाच्या आंदोलनात डबेवाले
By admin | Published: May 6, 2014 08:57 PM2014-05-06T20:57:51+5:302014-05-07T04:02:44+5:30
मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी आता मुंबईतील डबेवाले सरसावले आहेत.
मुंबई : मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी आता मुंबईतील डबेवाले सरसावले आहेत. आरक्षण आणि इतर मुद्यांवर त्यांचा मेळावा ९ मे रोजी मुंबईत होणार आहे.
शिवसंग्राम संघटेनेचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी मंगळवारी डबेवाल्यांच्या नेत्यांसोबत पत्रपरिषद घेऊन सांगितले की, मराठा आरक्षणाच्या आमच्या मागणीला डबेवाल्यांच्या दोन्ही संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यात मुंबई डबे जेवण वाहतूक मंडळ आणि नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्टचा समावेश आहे.
मुंबईतील डबेवाल्यांपैकी बहुतेक मावळ भागातील मराठा समाजाचे आहेत. चार पिढ्यांपासून आम्ही हा व्यवसाय करीत आहोत. आमच्या नंतरची पिढी शिक्षण, नोकर्यांमध्ये जावी यासाठी मराठा आरक्षणाची नितांत गरज आहे. त्यामुळे शिवसंग्रामला या मुद्यावर पाठिंबा दिला असल्याचे मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले. आमच्या घरांच्या प्रश्नांसह इतरही समस्या सोडविण्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे, असे ते म्हणाले.
९ मे रोजीचा मेळावा मेटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते खा.गोपीनाथ मुंडे, विधान परिषदचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेनेचे नेते आ.सुभाष देसाई, खा.राजू शेी उपस्थित राहणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)