दाभोळच्या विजेवर रेल्वेची झुकझुक!
By admin | Published: November 27, 2015 03:40 AM2015-11-27T03:40:54+5:302015-11-27T03:40:54+5:30
तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून गुरुवारी सकाळपासून वीजनिर्मितीस सुरुवात झाली. दुपारी ३ वाजता ३०० मेगावॅट वीजनिर्मितीचा टप्पा गाठला.
मुंबई/गुहागर : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून गुरुवारी सकाळपासून वीजनिर्मितीस सुरुवात झाली. दुपारी ३ वाजता ३०० मेगावॅट वीजनिर्मितीचा टप्पा गाठला. ही वीज महाराष्ट्रातील रेल्वेसेवेला पुरविण्यात येत आहे.
कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात असलेला २१५० मेगावॅट क्षमतेचा दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ आॅक्टोबर २००५ रोजी रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प नावाने प्रकल्प सुरू झाला. अनेक वर्षे प्रकल्प बंद असल्याने वीजनिर्मिती सुरू करण्यात अनेक अडचणी आल्या. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर प्रकल्पातून सरासरी १००० मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. अपुऱ्या गॅसपुरवठ्यामुळे अखेर डिसेंबर २०१३पासून वीजनिर्मिती बंद करण्यात आली.
केंद्र व राज्यातील सत्ताबदलानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी हा प्रकल्प सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. ५०० मेगावॅट वीज खरेदी करण्याला रेल्वेकडून हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने वीजनिर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्याच्या ९ रुपये प्रति युनिट दराच्या तुलनेत अडीच ते साडेतीन रुपये दराने दाभोळ प्रकल्पातून वीज मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेची दरवर्षी ५00 ते ७00 कोटींची बचत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र
पाटील यांनी दिली.
या प्रकल्पातून महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या ३६, पश्चिम रेल्वेच्या ६, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ४ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या एका ट्रॅक्शन सब स्टेशनला वीज मिळेल.
दाभोळ प्रकल्पातून रेल्वेला व्यवस्थित वीजपुरवठा व्हावा यासाठी सीएसटी येथे ‘स्पेशल एनर्जी सेल’ स्थापन करण्यात आला आहे. हा सेल २४ तास कार्यरत असेल.