दाभोलकर, पानसरे हत्या; सीबीआयला अंतिम मुदतवाढ
By admin | Published: September 30, 2016 02:48 AM2016-09-30T02:48:22+5:302016-09-30T02:48:22+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील पुरावे तपासणीसाठी स्कॉटलॅण्ड यार्डच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून पाच महिने उलटले तरीही सीबीआयला अहवाल मिळवता
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील पुरावे तपासणीसाठी स्कॉटलॅण्ड यार्डच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून पाच महिने उलटले तरीही सीबीआयला अहवाल मिळवता आलेला नाही. अखेरीस उच्च न्यायालयाने सीबीआयला आणखी सहा आठवड्यांची मुदत देत अहवाल मिळवण्यासाठी ही अखेरची संधी देत असल्याचे बजावले.
दाभोलकर, पानसरे व कर्नाटकचे ज्येष्ठ साहित्यिक एम. कलबुर्गी या तिघांच्याही हत्या एकाच पिस्तुलातून झाल्या का, हे तपासण्यासाठी सीबीआयने घटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या रिकाम्या पुंगळया स्कॉटलॅण्ड यार्डच्या फॉरेन्सिक लॅबकडे मे महिन्यात पाठवल्या. मात्र अद्याप स्कॉटलॅण्डकडून अहवाल आला नसल्याचे गुरुवारी सीबीआयने उच्च न्यायालयाला सांगितले. आम्ही मे महिन्यापासून तुम्हाला (सीबीआय) स्कॉटलॅण्डकडून अहवला मिळवण्यासाठी मुदतवाढ देत आहोत. आता शेवटची सहा आठवड्यांची मुदतवाढ देत आहोत, असे न्यायालयाने बजावले. (प्रतिनिधी)