‘...तर दाभोलकरांचे मारेकरी सापडतील’
By admin | Published: August 29, 2014 03:36 AM2014-08-29T03:36:37+5:302014-08-29T03:36:37+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या परिवर्तन ट्रस्टमधील भ्रष्टाचाराची चौकशी केल्यास दाभोलकर यांचे मारेकरी सापडतील,
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या परिवर्तन ट्रस्टमधील भ्रष्टाचाराची चौकशी केल्यास दाभोलकर यांचे मारेकरी सापडतील, असा दावा हिंदू जनजागृती समितीने केला आहे. पोलीस आणि सीबीआयने ट्रस्टमधील सदस्यांची कसून चौकशी करण्याची मागणी समितीने गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
दाभोलकर यांच्या खुनानंतर समितीने सादर केलेल्या अनेक पुराव्यांकडे मुख्यमंत्री आणि पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सांगितले.
ते म्हणाले, जाणूनबुजून पोलीस हिंदुत्ववादी संघटनांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावत आहेत. याउलट ट्रस्टमधील एका सदस्यावर भ्रष्टाचार करून ४ लाखांची चारचाकी विकत घेतल्याचा आरोप शिंदे यांनी केला. शिवाय प्लँचेटची मदत घेण्याऐवजी समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या पुराव्यांचा आधार घेतल्यास मारेकरी सापडतील, असा दावाही केला. (प्रतिनिधी)