दुबार मोहराचा आंबा ठरले आकर्षण
By Admin | Published: July 6, 2014 10:50 PM2014-07-06T22:50:00+5:302014-07-06T23:31:08+5:30
लोणार तालुक्यातील नांद्रा येथे मृग बहाराचा आंबा आढळुन आला आहे
नांद्रा : फळबाग शास्त्रानुसार आंब्याला वर्षाकाठी दोन वेळा बहार येतो. आपल्या भागात मात्र, फेब्रुवारीत लागणार्या अंबिया बहाराची आंबेच चाखायला मिळतात. असे असले तरी लोणार तालुक्यातील नांद्रा येथे मृग बहाराचा आंबा आढळुन आला आहे. हा दुबार मोहराचा आंबा कुतूहलाचा विषय बनला असून, परिसरात आकर्षण ठरले आहे. अशा या दुर्मीळ मृग बहाराचा आंबा देणार्या आम्रवृक्षाचे जतन होणे आवश्यक आहे.
फळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा त्यामध्येही गावरान आंबा दिवसेंदिवस नामशेष होत चालला आहे. आंब्याच्या झाडाला फळे दरवर्षी येत नसल्याने रसाळी व लोणचे मिळणे दुर्मिळ झाले आहे. लोणार तालुक्यातील नांद्रा येथे गावच्या पश्चिमेस जनाबाई कोकाटे यांच्या शेतात गावराण आंब्याचे एक झाड आहे. त्याला वर्षातून दोन वेळा आंबे येतात. या आंब्यास फेब्रुवारीमध्ये आंबिया बहार लागून त्याचे एप्रिल महिन्यात आंबे चाखायला मिळतात. तर जून महिन्यात मृग बहार लागून त्याची ऑगस्ट महिन्यात फळे चाखायला मिळु शकतात. सध्या हा आंबा मृग बहाराने फुलुन गेला असून, त्याला छोटे-मोठे आंबे सुद्धा आले आहेत. उन्हाळ्यात ह्याच आंब्याला चार हजार आंबे आले होते. आता पुन्हा हा आंबा मोहराने फुलला आहे. तो श्रावण महिन्यात पाडी लागून फळे तोडायला परिपक्व होतात. अशा प्रकारे श्रावण महिन्यात आंब्याची दुबार लज्जत चाखायला देणारा हा आंबा ह्यश्रावण्याह्ण आंबा म्हणून सुद्धा ओळखतात. कृषी विभागाने याची दखल घेवून या मृग बहारी आंब्याच्या कोयीपासून रोपे तयार करावी किंवा या आंब्याची गुटी कलम करुन या दुर्मीळ वानाचे संवर्धन व जतन करावे. असे केल्यास शेतकरी प्रोत्साहीत होतील व श्रावण महिन्यातही आंब्याची गोडी चाखायला मिळेल.