अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांचा प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:27 AM2018-02-14T00:27:49+5:302018-02-14T00:27:58+5:30
घरफोड्या, जबरी चो-या, लूटमार करणा-या दरोडेखोरांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी मोहोळमध्ये पोहोचले खरे; मात्र दरोडेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवित तेथून पळ काढला.
मोहोळ (जि. सोलापूर) : घरफोड्या, जबरी चो-या, लूटमार करणा-या दरोडेखोरांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी मोहोळमध्ये पोहोचले खरे; मात्र दरोडेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवित तेथून पळ काढला. मात्र या हल्ल्यात मध्ये पडलेल्या आबू पाशा कुरेशी (वय-४८) या नागरिकाचा मृत्यू झाला तर तिघे पोलीस गंभीर जखमी झाले. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास शिवाजी चौकात मोहोळवासियांनी हे थरारनाट्य अनुभवले.
ग्रामीण भागातील वाढत्या चोºया, दरोडे, लूटमार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी अनेक पथके नेमली आहेत. त्यातच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक अग्रेसर होते. मोहोळ आणि परिसरातील दरोडेखोरांना अटक करण्यासाठी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पथक मोहोळमधील शिवाजी चौकात दाखल झाले. पोलीस आल्याचे समजताच दरोडेखोरांनी त्यांच्या दिशेने चाकूने प्राणघातक हल्ला चढविण्यास सुरुवात केली.
हा प्रकार पाहणारा आबु कुरेशी हा मध्ये पडला. दरोडेखोरांनी त्यालाही सोडले नाही. त्यांच्या हल्ल्यात कुरेशीचा हाकनाक बळी गेला. घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघा पोलिसांना तातडीने सोलापूरच्या अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल केले.
घटनेचे वृत्त समजताच पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहिते यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल झाले. वीरेश प्रभू यांनी जखमींची विचारपूस केली आणि प्राणघातक हल्ला चढविणाºया दरोडेखोरांच्या शोधार्थ ठिकठिकाणी पथके पाठविण्यात आली आहेत.