दरोडेखोरांनी लुटून नेले नऊ कोटी
By admin | Published: June 29, 2016 06:13 AM2016-06-29T06:13:54+5:302016-06-29T06:13:54+5:30
खासगी बँकांच्या मोठ्या ग्राहकांकडून रोकड गोळा करणाऱ्या ‘चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीवर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला.
ठाणे : खासगी बँकांच्या मोठ्या ग्राहकांकडून रोकड गोळा करणाऱ्या ‘चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीवर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. सात ते आठ जणांच्या टोळीने चॉपर आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तब्बल नऊ कोटी १६ लाखांची रोकड लुटली.
दरोडेखोरांनी जाताना सीसीटीव्हीचे डीव्हीआर, पाच कर्मचाऱ्यांचे मोबाइल आणि एका सुरक्षारक्षकाच्या रायफलमधील काडतुसेही नेली. अत्यंत योजनाबद्धपणे झालेल्या या लुटीत कंपनीच्याच माजी कर्मचाऱ्याचा समावेश असण्याचीही शक्यता कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. आयसीआयसीआय, स्टॅण्डर्ड चार्टर्ड आदी सहा बँकांच्या रोज लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या ग्राहकांकडून रोकड जमा करण्याचे काम ‘चेकमेट’ कंपनीकडून केले जाते. पनवेल ते मुंबई आणि ठाणे परिसरातील सुमारे एक हजाराहून अधिक ग्राहकांचा त्यात समावेश आहे. त्यात मोठे मॉल्स, सराफांची दुकाने, सहकारी बँकांचाही समावेश आहे. रोज या सेंटरमध्ये किमान १४ ते १५ लाखांची रोकड जमा होते. चौथा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बँका बंद असल्यामुळे सोमवारी तब्बल २६ कोटींची रोकड जमा झाली. त्यातील ११ कोटी रकमेच्या पत्र्याच्या बॅगा स्ट्राँगरूममधून बाहेर काढण्यात आलेल्या होत्या. त्यातील नऊ कोटी १६ लाख रुपये लुटल्याची माहिती ‘चेकमेट’चे मुंबई, बांद्रा सेंटरचे व्यवस्थापक शरद शेट्टी यांनी ‘लोकमत’ ला दिली. दरोडेखोरांनी दहा, वीस, पन्नास रुपयांच्या नोटांचे गठ्ठे तसेच टाकून दिले.
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या समोरील आणि एसीसी कंपनीच्या बाजूलाच असलेल्या रस्त्यावरील ‘हिरादीप’ इमारतीमधील बेसमेंटमध्ये ‘चेकमेट’चे सेंटर आहे. पहाटे २.३० ते ३.३० वाजेच्या सुमारास तोंडावर रुमाल लावून आलेल्या आठपैकी तिघांनी आधी गेटवरील सुरक्षारक्षक रामचंद्र कोरे यांच्या पोटाला चाकू लावून बाहेर काढले. दरोडेखोरांनी माझ्या श्रीमुखात लगावली आणि कॅश सेंटरमध्ये येण्सास फर्मावल्याचे कोरे यांनी पोलिसांना सांगितले. इमारतीच्या बेसमेंटमधील सेंटरमध्ये जाण्यासाठी स्वयंचलित लॉकचा वापर केला जातो.
बाहेरुन आपलेच सुरक्षारक्षक आल्याचे गनमॅन प्रकाश पवार यांनी पाहिल्यामुळे त्यांनी आतून मुख्य दरवाजा उघडला. परंतु, त्याच्या मागून आलेल्या या टोळीने आत रोकड मोजण्याचे काम करणाऱ्या १७ कामगारांना चॉपर आणि रिव्हॉल्व्हरने ठार मारण्याची धमकी देऊन एका बाजूला उभे केले. त्यातील अमोल कर्ले यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून एकाला मारल्यावर बाकीचे काम सोपे होईल, अशी त्यांच्यात चर्चा सुरू झाल्याने सारेच घाबरले होते. दरोड्यानंतर पोलिसांनी ठाणे परिसरातील रस्त्यांची नाकाबंदीही केली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. (प्रतिनिधी)
>ठाणे येथील ‘चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या कार्यालयात पडलेल्या दरोड्यानंतर पोलिसांनी कार्यालयाची पाहणी केली.