राज्य सरकार 'एक दिवस शेतावर' उपक्रम राबविणार; कृषिमंत्रीही घेणार सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 05:29 PM2020-02-09T17:29:19+5:302020-02-09T17:29:36+5:30
कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या थेट बांधावरच जावून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेणे गरजेचे असल्याचे कृषिमंत्री म्हणाले.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम कृषी खात्याकडून राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत खुद्द कृषीमंत्री महिन्यातून ‘एक दिवस शेतावर’ या उपक्रमात सहभागी होणार आहे. प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात कृषिमंत्री दादा भुसे यांनी ही माहित दिली.
यावेळी कृषिमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांची केवळ पारंपरिक शेतीवरच भिस्त नसावी तर त्यांचा शेतमाल थेट निर्यातीची क्षमता असणारा असावा. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या थेट बांधावरच जावून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
त्यामुळे सचिव, कृषी अधिकाऱ्यांप्रमाणे मी देखील ‘कृषी मंत्री’ या नात्याने दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या शेतात भेट देवून पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, उत्पादकता आणि उपलब्ध बाजारपेठ या विषयी त्यांना मार्गदर्शन करता येईल, असे ते म्हणाले.
कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. कृषीमंत्री या नात्याने मी या उपक्रमात सहभागी होणार आहे. @MahaDGIPR@CMOMaharashtrapic.twitter.com/2F1zCHODn5
— Dadaji Bhuse (@dadajibhuse) February 7, 2020
तर कृषी सचिव, आयुक्त यांनी पंधरवाड्यातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या शेतावर उपस्थित राहून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व कृषी उत्पादनासंदर्भात माहिती द्यावी, असे आवाहनही दादा भुसे यांनी यावेळी केले.