दादा भुसेंच्या अश्रूंनी मतपरिवर्तन झाले; शिवसैनिकांनी त्यांचे समर्थन सुरू केले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 08:31 AM2022-07-07T08:31:21+5:302022-07-07T08:31:53+5:30

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका मांडली. त्याचवेळी दादा भुसे यांना अश्रू अनावर झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

Dada Bhuse's tears changed mind; Shiv Sainiks started supporting him | दादा भुसेंच्या अश्रूंनी मतपरिवर्तन झाले; शिवसैनिकांनी त्यांचे समर्थन सुरू केले

दादा भुसेंच्या अश्रूंनी मतपरिवर्तन झाले; शिवसैनिकांनी त्यांचे समर्थन सुरू केले

Next

राज्यात आणि देशभरात मागील काही वर्षांपासून ‘ईडी’ अर्थात अंमलबजावणी संचालनालय चांगलेच चर्चेत आहे. एखाद्या राजकीय नेत्याला ईडीची नोटीस आली की समस्त राजकीय वातावरण तापते. मग केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करून दबाब टाकत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ईडी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्तापरिवर्तनासाठीदेखील ईडीच्या कारवाईचा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप राज्यातील आत्ताच्या विरोधकांकडून केला जात आहे. याबाबतचे अनेक मीम्स आणि विनोद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या व्हायरल संदेशातील ईडी म्हणजे ‘अंमलबजावणी संचालनालय’ नव्हे, तर ‘इ’ म्हणजे नवनियुक्त मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे’ आणि ‘डी’ म्हणजे उपमुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ असा आहे.  या पोस्टमध्ये दोघांचे फोटो वापरण्यात आले असून, हा मनोरंजनाचा विषय ठरत आहे. 

‘ना रहेगा बास ना रहेगी बांसुरी’...
राज्य शासनाने १ जुलैपासून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात एकल प्लास्टिक वापरास पूर्णत: बंदी घातली  आहे. हा निर्णय नागरिकांच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. त्याचे समाजातून स्वागतच व्हायला हवे, यात शंका नाही. बंदीमुळे पर्यावरणाची हानी टळेल, असा विश्वास आहे. शासनाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकल प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाईदेखील सुरू  केली आहे. परंतु, ज्या ठिकाणी हे प्लास्टिक निर्माण होते, ते कारखाने अजूनही सुरू असल्याने शासनाच्या आदेशाला किती महत्त्व आहे, यावर समूहात चर्चा सुरू होती. बंदी नंतरही हे कारखाने सुरू असतील तर प्लास्टिक वापर बंद होईल कसा अशी चर्चा सुरू असताना एकाने एकीकडे बंदी घालायची अन् कारखाने सुरूच ठेवायचे या धोरणावर टीका केली. शासनाने कारवाई करण्यापेक्षा या फॅक्टरीच बंद केल्या तर ‘ना रहेगा बास ना रहेगी बासुरी’... असे त्याने म्हणताच एकच हशा पिकला.

ताई आल्या, लाटल्या पुऱ्या !
राजकीय लोकांचा अनुनय करणे सोपे नसते, मात्र राजकीय व्यक्ती लोकानुयन करू शकतात. लोकांमध्येच त्यांचा वावर असल्यामुळे ही कला आत्मसात करणे राजकारण्यांसाठी आवश्यकही असते. त्याचमुळे कधी लग्न समारंभात फेर धरणे असो वा कीर्तन, भजनात टाळ वाजविणे, या साऱ्या बाबी राजकीय व्यक्ती लिलया करतात. अर्थात हे सारे करण्यामागे राजकीय व्यक्तीही हौस तर असतेच परंतु त्यामागे काही ना काही स्वार्थही दडलेला असतो. परंतु सामान्य व्यक्तींसाठी हे सारे अप्रुप असते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यादेखील अशाच कारणावरून चर्चेत आल्या आहेत. एरव्ही कामाच्या व्यापामुळे सार्वजनिक समारंभांना उपस्थित राहणे अवघड होत असल्यामुळे जसा वेळ मिळेल तसा त्याचा उपयोग करून घेण्यात ताई यांचा हातखंडा. त्यामुळे चांदवड दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी देनेवाडी येथील शेतकऱ्याच्या घरी कन्येच्या विवाह सोहळ्याची लगीन घाई सुरू असल्याने ताईंनी थेट शेतकऱ्याचे घर गाठले. नववधूला शुभाशीर्वाद तर त्यांनी दिलेच, परंतु लग्न घरी महिला मंडळी पुऱ्या लाटत असल्याचे पाहून ताई यांच्यातील स्त्री जागृत झाली व त्यांनी पदर खोचून जमिनीवरच ठाण मांडून पुऱ्या लाटायला सुरुवात केली. केंद्रीयमंत्री चक्क लग्न समारंभात पुऱ्या लाटत असल्याचे वृत्त पंचक्रोशीत पसरले. आता ताईंनी लाटलेल्या पुऱ्या कोणाच्या नशिबात त्यावर चर्चा झडू लागली.

दादा भुसे यांच्या अश्रूंनी मतपरिवर्तन झाले
राज्यातील सत्तांतरात नाशिकच्या दोन आमदारांनी मोलाचा वाटा उचलला. त्यात माजी कृषिमंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांचा समावेश होता. दादा भुसे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर मालेगावमधील शिवसैनिकांची आणि समर्थकांची नक्की भूमिका काय हेच कळेनासे झाले होते. अनेकांना तर काय भूमिका घेऊ हे कळत नव्हते. मात्र, दादा भुसे यांनीच हा प्रश्न जणू सोडवला. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका मांडली. त्याचवेळी दादा भुसे यांना अश्रू अनावर झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो मालेगावमधील एका व्हॉट्स ॲपग्रुपवरदेखील आला. दादा भुसे यांनी जी भूमिका घेतली ती आपल्यासाठीच घेतली, बघा दादांना अश्रू अनावर झाले अशा टिप्पणी करीत त्यांचे समर्थन सुरू केले आणि केवळ दादांच्या अश्रुंमुळे अनेकांची भूमिका निश्चित झाली.

 

Web Title: Dada Bhuse's tears changed mind; Shiv Sainiks started supporting him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.