‘दादा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: June 14, 2015 01:54 AM2015-06-14T01:54:15+5:302015-06-14T01:54:15+5:30
अभिनेता अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांचा ‘दादा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेते दादा कोंडके यांच्या नावावर किंवा जीवनावर चित्रपट
पुणे : अभिनेता अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांचा ‘दादा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेते दादा कोंडके यांच्या नावावर किंवा जीवनावर चित्रपट काढण्याचा अधिकार हा फक्त शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानलाच आहे, अशी हरकत घेत प्रतिष्ठानने निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही बजावली आहे.
अनिता पाध्ये लिखीत ‘एकटा जीव’ हे पुस्तक दादांच्या मृत्यू नंतर १९९९मध्ये प्रकाशित झाले. मात्र, या पुस्तकाला दादाची कोणतीही सहमती नसल्याने व अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याविषयी वादग्रस्त मजकूर असल्याने या पुस्तकावर न्यायालयात सध्या खटला सुरू आहे. आता याच पुस्तकावर ‘दादा’ हा चित्रपट येणार असल्याचे कळले आहे. वास्तविक या पुस्तकाचे हक्क प्रतिष्ठानकडेच आहेत. शिवाय दादांच्या जीवनावर नाटक अथवा चित्रपट निर्मिती करायची असेल तर प्रतिष्ठानची परवानगी घेणे कायदेशिररित्या बंधनकारक आहे. त्यानुसार आम्ही निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे, अस प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हृदयनाथ कडूदेशमुख म्हणाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत भालेकर यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाल्याने अध्यक्षपदी संग्राम शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात शिर्के मध्यस्थ असल्याचेही कडूदेशमुख यांनी सांगितले.
दादा कोंडके यांच्यावर चित्रपट काढायला आमचा विरोध नाही. मात्र अशी कलाकृती बनविण्यापूर्वी निर्मात्याने रितसर प्रतिष्ठानची परवानगी घ्यावी. त्याविषयीची स्क्रीप्ट प्रतिष्ठानच्या सभासदांकडून संमत झाल्यावर निर्मितीचा मार्ग मोकळा होईल. त्यानंतर प्रतिष्ठानला योग्य ती रॉयल्टी देण्यात यावी.
- हृदयनाथ कडूदेशमुख, उपाध्यक्ष, शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान