दादासाहेबांच्या घरात आदळ-आपट..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 02:17 AM2016-11-13T02:17:43+5:302016-11-13T02:17:43+5:30

नरेंद्र मोदींनी ५०० आणि हजाराच्या नोटा बंद करायचा निर्णय घेतला आणि देशात सगळीकडे धूम सुरु झाली. दादासाहेब मंत्रालयात काम करत होते. मधेच ते लघूशंकेला गेले...

Dada Saheb's house, Adal-Apat! | दादासाहेबांच्या घरात आदळ-आपट..!

दादासाहेबांच्या घरात आदळ-आपट..!

Next

- अतुल कुलकर्णी

नरेंद्र मोदींनी ५०० आणि हजाराच्या नोटा बंद करायचा निर्णय घेतला आणि देशात सगळीकडे धूम सुरु झाली. दादासाहेब मंत्रालयात काम करत होते. मधेच ते लघूशंकेला गेले...
तेथे एकजण एका हातात मोबाईल धरुन ‘तू किती काढलेस रे बाहेर...’ असे ओरडून विचारु लागताच शेजारी उभ्या दादासाहेबांनी त्याच्याकडे एकदा खालून वरपर्यंत चमकून पाहिले... ‘शी... काय हा घाणेरडेपणा’, असे दादासाहेब म्हणताच तो चिडला, ‘अहो, काही काय बोलताय... मी नोटा किती काढल्या ते विचारतोय... तुम्ही किती काढलेत...’ अधिक हुज्जत न घालता दादासाहेब तात्काळ तेथून बाहेर पडले...
बाहेर आले तर, एका साहेबाचे पीए सुतकी चेहरा केलेले दिसले. काळजीने दादासाहेबांनी विचारले, ‘काय रे बाबा, काय झाले’ त्यावर त्याने हातानेच ‘तीन गेले’, असा इशारा केला... ‘तीन काय?’ असे विचारले. त्यावर तो ‘बोंबा मारु नका... गप्प बसा’ असे ओरडलाच... दादासाहेबांनी शिपायाला विचारले काय झालं यांना... त्यावर शिपाई म्हणाला, ‘साहेब, जावा ना आता, कशाला डोकं पिकवतायं... आधीच लई नुकसान झालयं...’
तेवढ्यात दादासाहेबांच्या सौं.चा फोन आला. त्या तिकडून वैतागून म्हणत होत्या... ‘कुठे फिरताय तुम्ही... आधी घरी या, फार राडे झालेत’. सौं. चा आवाज ऐकून स्वारी तात्काळ घरी पोहोचली. त्यांच्या बायकोने दादासाहेबांना बेडरुममध्ये घेत दार लावून घेतले. त्यावर लाजत लाजत दादासाहेब म्हणाले, ‘अगं, दार कशाला लावतेस, अजून रात्रीचे १२ वाजायचे आहेत!’
‘जळ्ळं मेलं तुमचं लक्षणं... माझे बारा वाजायची वेळ आलीय... दुसरं काही सुचतच नाही तुम्हाला...
हे चार लाख रुपये आहेत, आधी बदलून आणा बँकेत जाऊन’-इति बायको.
‘अगं पण हे आणलेस कुठून... आणि एवढे दिवस मला कसे कळले नाही तुझ्याकडे एवढे पैसे असल्याचे’-दादासाहेब
‘तुमच्यापासून लपवून ठेवले होते... मला मेलीला हौस नाही, मौज नाही... आले पैसे की जमा करुन ठेवत आले मी... घराला होतील म्हणून... एक दागिना घेतला नाही मनासारखा आजवर... घरासाठी, घरासाठी... म्हणून ठेवले होते... ते मोदी म्हणाले होते तुमच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार म्हणून... ते राहीलं बाजूला, उलट आहे ते पण वाया चाललं आता’, असे म्हणत सौं.नी गळा काढत पदर डोळ्याला लावला.
काहीसा धीर देत दादासाहेब म्हणाले, ‘अगं पण अडीच लाखापर्यंत तू बँकेत भरु शकतेस... कशाला चिंता करतेस... बाकीच्याचे काय करायचे ते पाहू...’
‘ते काही नाही, मला बदलून आणून द्याच...’ गृहमंत्र्यांचे टुमणे सुरुच.
‘अगं पण कशाला पाहिजेत तुला बदलून...’
‘तुम्हाला माहिती तरी आहे का, कसे घर चालवते ते... अजून दूधवाला चेक नाही घेत आपल्याकडे... आणि त्या भाजीवाल्याकडे तुमचं कार्ड नाही चालतं... कामवाल्या शांतेला रोख रक्कम द्यावी लागते... तुम्ही टॅक्सीने फिरता, भेळ, पाणीपुरी खाता, रेल्वेचे पास काढायचे सगळ्यांचे, सिगरेटी ओढता, पेपरवाला रोख घेतो, तुमच्या अ‍ॅसीडीटीच्या गोळ्यासाठी मेडीकलवाला कार्ड नाही घेत... आणि पोरांच्या टू व्हिलरमध्ये पेट्रोल कशाने टाकता... अधून मधून ती तुमची चपटी पण आणता... त्यांना काय चेक देता की क्रेडीट कार्ड... मोठे आलात मला विचारणारे... माझी मेलीची कसली हौस नाही, साधी साडी आणायची म्हणाले तर तुमचे काही तरी निघते... घर म्हणून चार पैसे जमवले ते पण तुम्हाला पहावले नाही...’ सौं.चा साठलेला राग बाहेर आला.
‘अगं मला नाही, त्या मोदीला पहावले नाही तुझे एवढे पैसे... पण एवढी चिडू नकोस... काढू काहीतरी मार्ग... बँकेत जाऊन बघतो काय ते...’, दादासाहेबांचा समजुतीचा सूर.
‘ते काही नाही... काहीही करा, पण माझा पैसा मला मिळालाच पाहिजे... नाही मिळाला तर बघा...’, आता सौ. चक्क धमकीवर आली.
‘मला काय बघा म्हणतेस... त्या मोदीला सांग जाऊन... मला पण फटका बसलाय... मी काही बोललो का तुला...’, दादासाहेबांचा प्रतिहल्ला.
‘आत्ता गं बाई... तुम्ही काय करुन बसलात आता...’, समोरून धास्तीचा सूर.
‘आपल्या शेतातल्या भाजीचे पैसे तो माधव नाही का जमा करत... त्याने परवा सगळा हिशोब आणून दिला... आज भरु, उद्या भरु म्हणून मी तसेच ठेवले होते... शिवाय शामरावच्या पोराच्या अ‍ॅडमिशनसाठी दिलेले पैसे पण त्याने परत आणून दिले होते. विचार केला होता आणखी थोडे आले की आपल्या बांधाला लागून जमिनीचा तुकडा होता तो घेऊन टाकू म्हणून ठेवले होते...’, दादासाहेबांनी खुलासा केला.
‘तरीच म्हणलं, मी बेडरुममध्ये नसले की तुमचं काहीतरी खूडखूड चालत होतं... आणि मला का नाही सांगितले तुम्ही... होते तरी किती...’, पुन्हा कुरकूर सुरु.
‘जाऊ दे ना... होते सहा सात लाख...’
‘देवा रे देवा... पण शेताची कमाई टॅक्स फ्री आहे ना...’, बायकोचे ज्ञानामृत.
‘अगं आहे पण त्यासाठी माल विकल्याच्या पावत्या, मार्केट कमिटीच्या पावत्या लागतात... त्या नाही ना घेतल्या मी माधवकडून...’, दादासाहेबांनी अडचण मांडली.
‘बसा आता शंख करत... घ्या त्या मोदीला अजून डोक्यावर...’, आणखी एक वार.
‘अगं त्यांची काय चूक यात... अतिरेक्यांना वठणीवर आणण्यासाठी केलयं त्यांनी हे सगळं...’, दादासाहेबांचा सरकारी सूर.
‘पण आपली सूनबाई बँकेत आहे, ती तर म्हणत होती, की मोठमोठ्या उद्योगपतींचे या सरकारने आजवर २ लाख कोटी रुपये कायमचे माफ करुन टाकले... मग आपल्यालाच का ही शिक्षा...’, पत्नीचा सवाल.
‘ते तुला नाही कळायचं... आपण तुझ्या चार लाखाचं कसं निपटवायचं ते बघू... शांत राहा आता’... (असे बोलत दादासाहेबांनी टीव्ही लावला तर त्यावर मोदींचे भाषण चालू होते..)
‘मित्रों... छोटा बच्चा जब मिठाई खाता है तो उसकी मां उसे खाने नही देती... मिठाई छुपाके रखती है... ठिक ऊसी तरह मैने कई लोगोंकी मिठाई बंद करवाई है....’
(रागारागाने आलेल्या सौ.नी धाडकन टीव्ही बंद करुन टाकला, आणि स्वैपाकघरात गेल्या, आतून बराच वेळ भांड्यांच्या आदळआपटीचे आवाज येत राहीले...)

Web Title: Dada Saheb's house, Adal-Apat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.