‘दारूकांडा’तील दादा वाणी पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: February 25, 2017 04:44 AM2017-02-25T04:44:01+5:302017-02-25T04:44:01+5:30
जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये तयार होणाऱ्या बनावट दारूसाठी अल्कोहोल पुरविणाऱ्या शिरपूरच्या (जि़ धुळे) दादा वाणीला नगर पोलिसांनी शुक्रवारी नाशिक तुरुंग प्रशासनाकडून ताब्यात घेतले़
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये तयार होणाऱ्या बनावट दारूसाठी अल्कोहोल पुरविणाऱ्या शिरपूरच्या (जि़ धुळे) दादा वाणीला नगर पोलिसांनी शुक्रवारी नाशिक तुरुंग प्रशासनाकडून ताब्यात घेतले़ वाणी एमपीडीएच्या कायद्याअंतर्गत नाशिक तुरुंगात आहे़
पांगरमल येथील पार्टीसाठी जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमधून गेलेल्या देशी दारूच्या बाटल्यांमध्ये मानवी शरीरासाठी घातक अल्कोहोल व मिथेनॉल मिसळल्याचे उघडकीस आले आहे़ या विषारी दारूमुळे आतापर्यंत ९ जणांचा बळी गेला.
वाणीच्या चौकशीत तो आणखी कुणाला अल्कोहोल पुरवित होता याचा उलगडा होणार आहे़ वाणी याच्याकडून कॅन्टीनमधील भरत जोशी याने ३०० लीटर अल्कोहोल आणले होते़ त्यापासून १२०० लीटर दारू तयार केली गेली होती. (प्रतिनिधी)
‘त्या’ पोलिसांवरही कारवाई?
जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये बनावट दारू तयार करणारा जाकीर शेख याच्या संपर्कात स्थानिक गुन्हे शाखेतील एक व तोफखाना पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी होते़ गेल्या सहा महिन्यांत त्यांचे जाकीरशी सतत बोलणे होत होते़ हे कॉल डिटेलमधून समोर आले आहे़