दादर स्थानकात ठाणे लोकलला आग, प्रवाशांमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 09:54 PM2018-02-02T21:54:01+5:302018-02-02T22:45:14+5:30
दादर स्थानकात ठाण्याला जाणा-या लोकलला आग लागल्याची घटना घडली आहे.
मुंबई : दादर स्थानकात फलाट क्रमांक 1 वरून कल्याणच्या दिशेनं जाणा-या ठाणे लोकलमध्ये आग लागल्याची घटना घडली . शुक्रवारी रात्री 9 वाजून 24 मिनिटांनी ही घटना घडली. सीएसएमटी येथून निघालेली ठाणे लोकल दादर स्थानकात पोहोचली. लोकल ठाणे दिशेने थोडी पुढे निघाली असता अचानक लोकल बोगीतून धूर येत असल्याने प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्या. ब्रेक-बायडिंगमुळे आग लागली असून 10 मिनिटांत आग नियंत्रणात आणण्यात आली. आगीमुळे केवळ 3 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या उर्वरित फे-या फलाट क्रमांक 4 वरुन वळविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
दादर स्थानकातील घटनेमुळे डाऊन दिशेसह अप धीम्या लोकलची वाहतूक ही थांबवण्यात आली. त्याच बरोबर कल्याण-कसारा दिशेला जाणाºया लोकल परळ, भायखळा या स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी व्यक्त केली आहे. ‘पुढील सूचना मिळेपर्यंत करी रोड, चिंचपोकळी रेल्वे स्थानकांवर लोकल थांबवण्यात येणार नाही, अशी उद्घोषणा परळ, करीरोड आणि चिंचपोकळी स्थानकात करण्यात आली. यामुळे रेल्वे स्थानकांदरम्यान उभ्या असलेल्या जलद लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू झाली.
रात्री उशिरा घरी परतणा-या कर्मचा-यांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला. लोकलमधून धूर येत असल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीनं दिली आहे. मध्य रेल्वेनं आगीवर नियंत्रण मिळवल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. 5 फायर इंजिन आणि 4 जम्बो टँकरच्या मदतीने आग नियंत्रणात आली. या घटनेत रात्री 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
रेल्वे कर्मचारी आणि अग्निशमन दलाने तातडीने उपाययोजना केली. आग लागल्यानंतर यंत्रणेने त्वरित आगीवर नियंत्रण मिळविले. फलाट क्रमांक १ वगळता अन्य मार्गांवरून वाहतूक सुरू करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीबाबत एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात येईल.
- एस.के. जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे