देश सध्या संकटात! मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:30 AM2017-07-30T03:30:07+5:302017-07-30T06:11:54+5:30
‘सध्याचा काळ हा अडचणींचा काळ आहे. देश संकटातून जात आहे. शेजारी राष्टÑे रोज कुरापती काढत आहेत. याचा परिणाम काय होईल, हे मी सांगू शकत नाही.
औरंगाबाद : ‘सध्याचा काळ हा अडचणींचा काळ आहे. देश संकटातून जात आहे. शेजारी राष्टÑे रोज कुरापती काढत आहेत. याचा परिणाम काय होईल, हे मी सांगू शकत नाही. काही होऊ नये, ही अपेक्षा आहे, पण देशाच्या संरक्षणासाठी तुम्ही-आम्ही सारे जण सगळे मतभेद विसरून एक झाले पाहिजे आणि देशसंरक्षणासाठी पडेल ती खबरदारी घेतली पाहिजे, असे उद्गार माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे काढले.
सर्वपक्षीय नागरी सत्काराच्या कार्यक्रमात ते म्हणाले, अशा कार्यक्रमांनी ऊर्जा मिळते. अनेकांची भाषणे ऐकून मला माझ्यातले माहीत नसलेले गुणही कळले. यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, उद्धवराव पाटील यांची कार्यपद्धती जाणून घेण्याची संधी मला मिळाली, असे उल्लेख करून पवार म्हणाले की, १९६७ साली मला तिकीट मिळत नव्हते; पण याच मराठवाड्याचे विनायकराव पाटील प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी २८८ पैकी ८८ जागा निवडून येणार नसतील तर आणखी एक जागा मिळणार नाही, म्हणून शरद पवारांना तिकीट द्या, अशी भूमिका बजावली होती. हे मी विसरू शकत नाही आणि विनायकराव पाटील यांच्यामुळेच माझा विधानसभेत प्रवेश झाला आणि आज मी इथपर्यंत पोहोचलो. मला राजकारणात आणि समाजकारणात उभे करण्याचे काम मराठवाड्याने केले.
उद्धवराव पाटील, उत्तम प्रशासक शंकरराव चव्हाण, बापुसाहेब काळदाते, उत्तम वक्ते शिवाजीराव देशमुख, सुंदरराव सोळुंके, केशरकाकू क्षीरसागर आणि गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यांचा नामोल्लेख करीत शरद पवार यांनी आठवणी ताज्या केल्या.
यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असतानाचा हा अनुभव सांगताना शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा ताफा पैठणहून औरंगाबादकडे निघाला असताना एका महिलेने हात दाखवला. यशवंतरावांनी गाडी थांबवली. ते गाडीतून बाहेर आल्यानंतर त्या महिलेने ‘यशवंतराव चव्हाण तुम्हीच का?’ म्हणून विचारले. यशवंतरावांनी ‘होय’ म्हटल्यानंतर त्या महिलेने कमरेच्या चंचीतून चांदीचा एक रुपया काढला आणि तो यशवंतरावांच्या हातात ठेवत सांगितले की, ‘महाराष्टÑाचे चांगले काम करा. हा एक रुपया राहू द्या तुम्हाला खाऊसाठी.’ यशवंतरावांनी हा चांदीचा एक रुपया अखेरपर्यंत सांभाळून ठेवला होता. हा आहे मराठवाडा. जीव लावणारा, प्रेम करणारा. मराठवाड्यातील दोन घटनांचा शरद पवार यांनी उल्लेख केला. विद्यापीठ नामांतर व किल्लारीचा भूकंप या त्या घटना. किल्लारीतल्या भूकंपासारखे चित्र मी कधी पाहिले नव्हते. त्यातला माणूस सावरायचाय या निर्धाराने मी काम करीत राहिलो आणि त्यात लोकांनीही भरपूर प्रतिसाद दिला. भूकंप पहाटे आला आणि मी सकाळी ७.३० वाजता किल्लारीत दाखल झालो. सारी यंत्रणा कामाला लावली.
विद्यापीठ नामांतराचा प्रश्न संवेदनशील बनला होता. देशात शिवाजी महाराजांच्या, गांधी- नेहरूंच्या नावाने विद्यापीठे आहेत, तर मग ज्यांनी देशाची घटना लिहिली, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का नको, असा हा प्रश्न होता; परंतु नामविस्तार करून बाबासाहेबांचे नावही दिले जाऊ शकते, हे सिद्ध केले. तरुण पिढीनेही ते स्वीकारले, याचा मला विशेष आनंद आहे. या निर्णयामुळे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाचेही एक विद्यापीठ सुरू झाले.
कर्जमाफी का नको...?
कर्जमाफीच्या प्रश्नावर शरद पवार अत्यंत पोटतिडकीने बोलले. त्यांनी सांगितले की, अलीकडेच बिगर शेतीचे ५० हजार कोटींचे कर्ज माफ केल्याची बातमी आली आहे.
मग शेतकºयांच्या डोक्यावरचे ३४ हजार कोटींचे कर्ज माफ करायला आढेवेढे का घेताय? शेतकºयांची क्रयशक्ती सुधारल्याशिवाय देश सुधारणार नाही, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. शेतमालाला हमीभाव देण्याचे सत्तेत येण्यापूर्वी कबूल केले होते. तो शब्द पाळला गेला पाहिजे.
शेतकरी कधीही देणे विसरत नाही. त्यामुळे कर्जमाफीची त्याला सवय नको, असे म्हणण्याला काही अर्थ नाही.
हे पोरगं कायम सभागृहात राहील...
माझा जन्म १२ डिसेंबर १९४०चा. १६ डिसेंबरला लोकलची निवडणूक होती. शंकरराव मोरे उमेदवार होते. चार दिवसांचा मी. आईने मला पदरात घेतले आणि लोकलच्या निवडणुकीसाठी गेली. सभागृहात शंकरराव मोेरे यांच्या बाजूने तिने हात वर केला. मोरेंनी विचारले, ‘पदरात काय?’ आईने सांगितले की, ‘चार दिवसांचं पोरगं घेऊन आलेय.’ मोरे म्हणाले, ‘हे पोरगं सतत सभागृहात राहील.’
नितीन गडकरी यांची जोरदार फटकेबाजी...
केंद्रीय मार्ग परिवहन व महामार्ग, नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांचा गुणगौरव करीत काँग्रेस, समाजवाद, साम्यवाद या मुद्यांवर टोलेबाजी केली.
ते म्हणाले, सत्काराच्या वेळी काही जण मनातून बोलतात. काही जण मनात नसताना बोलतात. मी मात्र मनापासून बोलणार आहे. काही व्यक्तींची प्रतिष्ठा पदामुळे वाढते, तर काही व्यक्तींमुळे पदाची प्रतिष्ठा वाढते. शरद पवार यांनी पदांची प्रतिष्ठा वाढवली आहे. मी जेव्हा २१ वर्षांचा होतो, तेव्हा ते महाराष्टÑाचे मुख्यमंत्री होते. पवार यांनी काळाच्या ओघात आर्थिक चिंतनातून, चौकटी बाहेर जाऊन विचार केला. व्यवहारिक आधारावर त्यांनी चिंतन केले.
आता कम्युनिस्ट विचारसरणी संपली. समाजवादी विचारसरणीचीही तीच स्थिती आहे. संजय गांधी यांनी त्याकाळात मारुती गाडी स्वीकारली नसती, तर आज एवढा रोजगार मिळाला नसता. त्या-त्या वेळचे ते ते विचार श्रेष्ठच असतात. पं. नेहरू, लोहिया यांची विचारसरणी, कम्युनिस्ट विचारसरणी त्या त्या वेळी श्रेष्ठ असेलही; परंतु शरद पवार यांनी नेहमीच व्यवहारिक आधाराला गरिबी जोडून ती कशी दूर करता येईल, याचा विचार केला.
शरद पवार यांच्यामुळेच विदर्भात बोइंग विमानाचे सर्व्हिसिंग सेंटर मिळाले, हेही गडकरी यांनी आवर्जून नमूद केले. ग्रामीण व कृषी क्षेत्राला शरद पवार यांनी जी दृष्टी दिली, ती नवीन पिढीला उपयुक्त आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री ठेवण्याची, संबंध प्रस्थापित करण्याची परंपरा महाराष्टÑात आहे. देशात कुठेच अशी परंपरा नाही. याच राजकीय संस्कृतीचं अनुकरण देशाने करण्याची गरज आहे. मोठे नेते.... छोटी मने ही आज सर्वात मोठी समस्या आहे. महाराष्टÑात असं नाही. मतभिन्नता असणे यात गैर काही नाही, पण मनभेद नको. शरद पवार यांनी आयुष्यभर हे सांभाळलं. त्यामुळेच त्यांना सर्व पक्षात मित्र आहेत. त्या बळावरच त्यांनी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, काँग्रेसची बलाढ्य शक्ती असतानाही महाराष्टÑ हलवून सोडला होता. त्या- त्या जिल्ह्यांचे शक्तिशाली नेते सोबत घेऊन त्यांनी मजबुतीनं राजकारण केलं.
आम्ही आदेशावर चालत नाही. भाजपाचा पुढला अध्यक्ष कोण, हे कुणीही सांगू शकत नाही; पण काँग्रेसचा भावी अध्यक्ष कोण, हे लहान मुलगाही सांगू शकतो, अशा शब्दांत गडकरींनी काँग्रेसची फिरकी घेतली.
ते जातील कुठं कळणार नाही...
शरद पवार हे चतुर राजकारणी आहेत. विमान उडेपर्यंत ते दिल्लीला जातील की कोलकात्याला हे कळत नाही, असेही म्हणाले.
शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडूनही गौरवोद्गार...
माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी शरद पवार यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणी जागवल्या. कृषिमंत्री म्हणून पवार यांनी चांगली कामगिरी बजावली. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी केलेले भाषण एक उत्कृष्ट भाषण ठरले. किल्लारीच्या भूकंपात त्यांनी कुणालाही तक्रार करता येणार नाही, असं काम करून दाखवलं, असे चाकूरकर यांनी नमूद केलं.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्टÑवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे आदींची भाषणे झाली.
माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेंद्र दर्डा, डॉ. पद्मसिंह पाटील, कुलगुरूबी. ए. चोपडे, जनार्दन वाघमारे यांच्यासह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, आमदार, पदाधिकारी आदींची मंचावर उपस्थिती होती.