प्रियकराकडून दगाफटका; प्रेयसीची जाळून घेवून आत्महत्या
By admin | Published: April 11, 2017 06:46 PM2017-04-11T18:46:20+5:302017-04-11T18:46:20+5:30
लग्नाचे आमिष दाखवून अनैतिक संबंध ठेवले़ नंतर मात्र लग्नास नकार देवून दुसऱ्या मुलीसोबत प्रियकर लग्न करीत असल्याचे समजल्याने प्रेयसीने पेटवून घेवून
ऑनलाइन लोकमत
मुखेड / जांब (जि. नांदेड), दि. 11: लग्नाचे आमिष दाखवून अनैतिक संबंध ठेवले़ नंतर मात्र लग्नास नकार देवून दुसऱ्या मुलीसोबत प्रियकर लग्न करीत असल्याचे समजल्याने प्रेयसीने पेटवून घेवून आत्महत्या केल्याची घटना ९ एप्रिल रोजी जांब बु़ (ता़ मुखेड) येथे घडली़ याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरूद्ध गुन्हा नोंदविला़
जांब बु़ येथील मयत तबसुम नवाज शेख हिचा विवाह नायगाव तालुक्यातील कहाळा येथील शब्बीर पटेल शेख यांच्याशी झाला़ विवाहानंतर तिला दोन अपत्य झाली़ मात्र सासरी पटत नसल्याने तबसुम माहेरी जांब बु़ येथे वडिलांच्या घरी राहण्यास आली़ दरम्यान, तिचे मगदुम गोरे मियॉसाब शेख याच्याशी सुत जुळले़ मगदुमने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले़ दुसरीकडे मगदुमच्या विवाहाची तयारी त्याच्या घरच्यांनी सुरू केली़ ही बाब तबसुम हिच्या लक्षात येताच तिने लग्नासाठी मगदुमकडे आग्रह धरला़ मात्र त्याने टाळाटाळ केली़ मगदुमचा विवाह चाकूर येथील मुलीशी जमवून ९ एप्रिल रोजी सकाळी जांब बु़ येथे धुमधडाक्यात पार पडत असतानाच तबसुम तेथे पोहोचली़ तिने लग्नास विरोध केला़ मागील हकीकत सर्वांसमोर मांडली़ काहींनी तिची समजूत घालून तिला वडिलांच्या घरी नेवून सोडले़
तथापि ही बाब सहन न झाल्यामुळे तबसुमने घराची कोंडी आतून लावून रॉकेल अंगावर टाकून स्वत:ला पेटवूून घेतले़ यात ती ९० टक्के भाजली़ तिला नांदेड येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला़ तबसुमचा भाऊ मोहसीन नवाज शेख याने मुखेड पोलिस ठाणे गाठून बहिणीच्या मृत्यू प्रकरणी मगदुम गोरे विरूद्ध तक्रार नोंदविली़ पोलिसांनी गुन्हा नोंदवून मगदुमला अटक केली़ सपोनि व्ही़ एम़ कांबळे तपास करीत आहेत़ नवरदेवाला लग्नाच्या बेडीऐवजी पोलिसांच्या बेड्या हातात घालाव्या लागल्या़ (वार्ताहर)