थायलंडच्या मंदिरात विराजमान होणार ‘दगडूशेठ’ची प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 10:52 AM2019-08-03T10:52:11+5:302019-08-03T10:55:21+5:30

दगडूशेठ गणपती हा देश-परदेशातील भक्तांचा लाडका बाप्पा आहे.

A 'dagdusheth ganpati murti' will be seated in a temple atThailand | थायलंडच्या मंदिरात विराजमान होणार ‘दगडूशेठ’ची प्रतिकृती

थायलंडच्या मंदिरात विराजमान होणार ‘दगडूशेठ’ची प्रतिकृती

googlenewsNext
ठळक मुद्देलाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान साडेचार फुटांची मूर्ती असून फायबरमध्ये नीलेश पारसेकर यांनी बनवली

लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान : साडेचार फुटांची मूर्ती असून फायबरमध्ये नीलेश पारसेकर यांनी बनवली
 पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे सर्व गणेशभक्तांचे श्रद्धास्थान. लाडक्या बाप्पाचे दर्शन परदेशातही घडावे, यासाठी थेट थायलंडमधील मंदिरात हुबेहूब दगडूशेठ बाप्पांसारखी मूर्ती विराजमान होणार आहे. ही मूर्ती साडेचार फुटांची असून फायबरमध्ये बनवली आहे. नीलेश पारसेकर यांनी ही 
मूर्ती बनवली आहे. मुखेडकर यांनी ही मूर्ती रंगवली आहे. नितीन करडे यांनी मुकुट, परशू, कान, शुण्डाभूषण, गळ्यातील हार असे विविध दागिने बनविले आहेत. मूर्ती काल थायलंडला रवाना झाली. 
दगडूशेठ गणपती हा देश-परदेशातील भक्तांचा लाडका बाप्पा आहे. परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांनाही बाप्पाचे दर्शन घेण्याची नेहमीच ओढ असते. त्यामुळे नागरिकांच्या पुढाकाराने थायलंडमधील बँकॉक येथील लक्ष्मी-नारायण मंदिरामध्ये गणपतीचे मंदिर बांधून तेथे या हुबेहूब दगडूशेठ गणपतीसारख्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. थायलंडच्या नागरिकांमध्ये दगडूशेठ बाप्पांविषयी विशेष प्रेम आहे. परंतु, प्रत्येकालाच पुण्यामध्ये येऊन बाप्पांचे दर्शन घेता येत नाही. त्यांना त्यांच्याच शहरामध्ये बाप्पाचे दर्शन घेता यावे आणि बाप्पाची पूजा करता यावी, अशी थायलंडवासीयांची इच्छा होती, यासाठी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 
नुकतीच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी थायलंड येथील धनंजय, उमेश, नीळकंठ, गंगा, तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी उपस्थित होते. 

दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असलेली मूर्ती चांदीची असून त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. मुकुट, शुण्डाभूषण, दोन कमळे, दोन शस्त्रे, परशू, कान, हार, चक्र आदींचा समावेश आहे. यासाठी साडेतेरा किलो चांदी वापरण्यात आली आहे. साधारणपणे दीड महिना दागिन्यांचे काम सुरू होते. मी या क्षेत्रामध्ये २८ वर्षांपासून कार्यरत आहे.- नितीन करडे, 
सराफ, आर्टिकल सेंटर
...
थायलंडमधील काही नागरिक एप्रिल महिन्यात माझ्याकडे आले होते. ते सर्व जण दगडूशेठ गणपतीचे भक्त आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडे चौकशी केल्यावर त्यांनी माझे नाव सुचवले. हाताशी कमी वेळ असल्याने मातीकामापासून सुरुवात करणे अवघड होते. माझ्याकडे तयार असलेले मॉडेल मी त्यांना दाखवले आणि त्यांना पसंत पडले. मार्बल पावडर, फायबर असे दर्जेदार साहित्य वापरण्यात आले आहे. मूर्तिकार म्हणून हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. मी जीडी आर्ट केले असून, २० वर्षांपासून प्रत्यक्ष काम करीत आहे.- नीलेश पारसेकर, मूर्तिकार

Web Title: A 'dagdusheth ganpati murti' will be seated in a temple atThailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.