वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By admin | Published: January 10, 2015 01:13 AM2015-01-10T01:13:00+5:302015-01-10T01:13:00+5:30
भरधाव वाहनाच्या धडकेत गर्भवती मादी बिबट ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास ज्ञानगंगा अभयारण्यातील नांद्री शिवारात घडली.
खामगाव (जि. बुलडाणा) : भरधाव वाहनाच्या धडकेत गर्भवती मादी बिबट ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास ज्ञानगंगा अभयारण्यातील नांद्री शिवारात घडली. ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट अपघातात ठार झाल्याची वर्षभरातील ही दुसरी घटना असल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्णातील खामगाव, मोताळा आणि चिखली परिसरात २०५.२२ चौरस किलोमीटर क्षेत्रात ज्ञानगंगा अभयारण्य वसले आहे. या अभयारण्यातून खामगाव-बोथा (फॉरेस्ट) मार्गे बुलडाणा हा राज्य मार्ग आहे. शुक्रवारी पहाटे ४च्या सुमारास सर्पमित्र एम.बी. रसाळ हे या मार्गाने जात असताना त्यांना नांद्रीनजीक बिबट मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी याबाबतची माहिती वन अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. डोक्याला, तोंडाला व मागील पायाला मार लागल्याने बिबटचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. शवविच्छेदन केले असता बिबट गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. बिबटच्या गर्भातील ३ बछड्यांचाही मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर बिबटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
च्खामगाव-बुलडाणा या मार्गावर अहोरात्र वर्दळ असते. ज्ञानगंगा अभयारण्यातील प्राणी रात्रीच्या वेळी भटकंती करत असताना या मार्गावरील वाहनांच्या धडकेचे शिकार बनत आहेत. गतवर्षी १ जानेवारी २०१४ रोजी बोथा घाटात रात्रीच्या वेळी मादी बिबटचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्या बिबटच्या पोटातही २ बछडे असल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले होते. गतवर्षभरात दोन मादी बिबट व गर्भातील पाच बछड्यांना भरधाव वाहनांमुळे प्राण गमवावे लागले आहेत.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या मार्गावर प्रत्येक १ किलोमीटर अंतरावर गतिरोधक बसविण्यासाठी खामगाव व बुलडाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहेत; मात्र केवळ २ ठिकाणीच गतिरोधक करण्यात आले आहेत.
- जी.व्ही. भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कार्यालय खामगाव.