ड्रगमाफिया बेबी पाटणकर गजाआड

By admin | Published: April 23, 2015 06:08 AM2015-04-23T06:08:21+5:302015-04-23T06:08:21+5:30

गेल्या दीड महिन्यापासून मुंबई व सातारा पोलिसांना चकवा देणारी महिला ड्रगमाफिया शशिकला ऊर्फ बेबी पाटणकर अखेर गजाआड झाली.

Dagmafia Baby Patankar Gajaad | ड्रगमाफिया बेबी पाटणकर गजाआड

ड्रगमाफिया बेबी पाटणकर गजाआड

Next

मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून मुंबई व सातारा पोलिसांना चकवा देणारी महिला ड्रगमाफिया शशिकला ऊर्फ बेबी पाटणकर अखेर गजाआड झाली. पाटणकर खासगी लक्झरी बसने सिंधुदुर्गमधील कुडाळहून मुंबईला येत होती. काल पहाटे सहाच्या सुमारास मुंबईच्या गुन्हे शाखेने पनवेलजवळ बस रोखून पाटणकरला ताब्यात घेऊन तिला अटक केली.
१० मार्चला सातारा पोलिसांनी खंडाळा तालुक्यातील कान्हेरी गावातून पोलीस शिपाई धर्मराज काळोखे याला अटक केली होती. त्याच्या घरातून एमडी या अमली पदार्थाचा सुमारे ११४ किलोचा साठा हस्तगत करण्यात आला. काळोखे मुंबईच्या मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याच्या चौकशीतून पाटणकरचे नाव पुढे आले होते. पाटणकर मुंबई पोलिसांच्या विशेषत: अमली पदार्थविरोधी पथकाच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. तिचे संपूर्ण कुटुंब अमली पदार्थांची तस्करी, खरेदी आणि विक्रीत सहभागी आहे. तिचा मुख्य अड्डा वरळीत आहे. काही वर्षांपूर्वी काळोखेची वरळी पोलीस ठाण्यात नेमणूक झाली होती, तेव्हापासून दोघांची ओळख होती. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध होते. तसेच पाटणकरच्या अमली पदार्थांच्या धंद्यात काळोखेचा सक्रिय सहभाग होता. त्याच्याकडून सातारा पोलिसांनी हस्तगत केलेला व मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातून सापडलेला एमडीचा साठा पाटणकरच्या मालकीचा होता.
सातारा पोलिसांच्या कारवाईआधी काही दिवसांपासून काळोखे-पाटणकर खासगी कारमधून कोकणात भटकंती करीत होते. याच कारने काळोखे कान्हेरी गावापर्यंत आला. तो गावी आपल्या घरी गेला तर पाटणकर कारने पुढील प्रवासासाठी रवाना झाली. ही घडामोड समजताच मरिन ड्राइव्ह पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलीस ठाण्यातील काळोखेच्या कपाटाची झाडाझडती घेतली, तेव्हा कपाटात काळोखेने दडविलेले सुमारे दोन किलो एमडी, विदेशी मद्याच्या बाटल्या, परकीय चलन असा ऐवज सापडला. काळोखेला त्याच्या गावी सोडल्यानंतर पुढे निघालेल्या पाटणकरचा मात्र काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. तेव्हापासून सातारा पोलीस, मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकासह गुन्हे शाखेची सर्व युनिट्स, गुन्हे शाखेची अमली पदार्थविरोधी पथके, मरिन ड्राइव्ह पोलीस तिचा तपास करीत होते. सहआयुक्त (गुन्हे) अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (पाटणकर) खासगी बसने मुंबईला येत असल्याची माहिती समाजसेवा शाखेचे निरीक्षक जगदेव कालापाड, निशिकांत विश्वकर, पोलीस शिपाई घाग, शिट्याळकर, खैरे, महिला पोलीस शिपाई जाधव या पथकाला मिळाली. त्यानुसार उपायुक्त (अंमलबजावणी) प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने काल पहाटे पनवेलमध्ये ठाण मांडले. संबंधित खासगी बस येताच ती रोखून या पथकाने झडती घेतली, तेव्हा तीन नातेवाइकांसह पाटणकर सापडली. तिला ताकाळ ताब्यात घेऊन मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी तिला अटक केली. न्यायालयाने तिला २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Dagmafia Baby Patankar Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.