डहाणू, बोर्डीचा पर्यटन विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2017 03:08 AM2017-03-03T03:08:36+5:302017-03-03T03:08:36+5:30

पर्यावरण व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे येत असतात

Dahanu, Bordi's tourism development, Khuntla | डहाणू, बोर्डीचा पर्यटन विकास खुंटला

डहाणू, बोर्डीचा पर्यटन विकास खुंटला

googlenewsNext


डहाणू : येथील पर्यावरण व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे येत असतात. परंतु त्यांना पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटेल. सुखाने रहावेसे वाटेल अशी स्थिती मात्र नाही. प्राथमिक सुविधाही नाहीत. त्यामुळे येथला पर्यटन विकास खुंटला आहे. या बाबीकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे. ना जिल्हा प्रशासनाचे त्यामुळे विस्तीर्ण किनारे, सुरुंच्या बागा असे वैभव असूनही पर्यटन विकासाबाबत डहाणू तालुका मागासलेलाच राहिला आहे.
डहाणू ते बोर्डी या १८ कि.मी रस्त्याची दुर्दशा झाल्याने पर्यटकांना अनुभव येतो तो गचके खात प्रवास करण्याचा. पालघर जिल्हयाच्या पश्चिम किनारपट्टीवरिल निसर्ग सौंदर्याने नटलेला चिंचणी, वाढवण, डहाणू समुद्र किनारा, नरपड बीच, आगर, चिखला आणि बोर्डी बीच, तसेच ऐतिहासिक डहाणू किल्ला या वास्तू पर्यटकांना आकर्षित करतात. परंतु त्यांना तिथे येतांना अनुभव मात्र निराशाजनक येतात. तसेच येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर, आशागडचे संतोषी माता मंदिर याबरोबर बोर्डीचा बारडाचा गड, गंभीर गड, भीम बांध या ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना चांगले रस्ते, स्वच्छ परीसर, स्वच्छ स्वच्छतागृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी या बाबीही दुर्मिळ आहेत.
धाकटी डहाणू आणि डहाणू गाव या दोन गावामधून वाहणारी खाडी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. हे दृष्य पाहिल्यावर या स्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्यावीशी वाटेल. या भागात जवळपास ३ हजाराहून अधिक मच्छीमारीचा बोटीतून पारंपारिक व्यवसाय केला जातो. तर निसर्गाने समृद्ध असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणात नारळी, पोफळी, केळी, आंबा, चिकू आणि मिरचीच्या या भागात बागा असून त्यामधून बागायती व्यवसायाला चालना मिळते आहे. परंतु याचा पर्यटनासाठी वापर करून घेण्याची कल्पकता ना पालिका दाखविते आहे, ना जिल्हा प्रशासन निरेसाठी प्रसिद्ध माड आणि खजुरापासून मिळणारी नीरा डहाणू तालुक्यात मुबलक आहे. सूर्या प्रकल्पामुळे उजवा अणि डावा तीर कालव्यातून शेतीला पाणी उपलब्ध झाल्यामुळे बारमाही शेतीतून शेतकरी उत्पन्न मिळवू लागले आहेत. तसेच लिली, मोगरा, झेंडूच्या फुलांची बागायती शेती केली जाते. ती ही बघण्यासारखी असते. त्यात चित्रपटांचे अथवा मालिकांचे शुटींगही होऊ शकते. परंतु त्याचा तसा वापर करण्याची योजकता दाखविली जात नाही. (वार्ताहर)
।वारली चित्रकला आणि तारपा नृत्य : डहाणूची सांस्कृतिक ओळख म्हणजे वारली चित्रकला आणि तारपा नृत्य ही आहे. आदिवासींचे सण, उत्सव लग्न सोहळे यामध्ये काढली जाणारी लग्न चौकातून आकर्षित करणारी वारली चित्रकला पर्यटकांच्या कौतुकाचा विषय असली तरी तिचा पर्यटनदृष्ट्या अविष्कार घडविण्याचे प्रयत्न होत नाही. तर आनंद साजरा करण्यासाठी होणारे तारपा नृत्य ही आदिवासींची खास नृत्य शैली या भागात पाहायला मिळते. तिचाही अविष्कार कुठे घडविला जात नाही. हे चित्र कधी बदलणार असा डहाणूकरांचा सवाल आहे.

Web Title: Dahanu, Bordi's tourism development, Khuntla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.