डहाणू परिषदेच्या बेफिकीरीने शासनाचे २० लाख रूपये पाण्यात
By admin | Published: March 1, 2017 03:01 AM2017-03-01T03:01:47+5:302017-03-01T03:01:47+5:30
डहाणू समुद्रकिनाऱ्यावर बाहेरगावाहून येणाऱ्या हजारो पर्यटकांना विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ माफक दरात उपलब्ध व्हावे
डहाणू : या नगरपरिषद प्रशासनाच्या ढीसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे शहरात कोट्यवधींची असंख्य विकास कामे अर्धवट स्थितीत पडून आहेत तर डहाणू शहरातील पारनाका येथील डहाणू समुद्रकिनाऱ्यावर बाहेरगावाहून येणाऱ्या हजारो पर्यटकांना विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ माफक दरात उपलब्ध व्हावे व महिला बचतगटांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने उभारलेल्या १९ पर्यटन स्टॉलची दुर्दशा झाली आहे. गेल्या चार,पाच वर्षांपासून हे स्टॉल बचतगटाना न दिल्याने हे स्टॉल वापराविना धूळखात पडून त्याची परझड होऊन ते निकामी झाल्याने शासनाचे वीस लाख रूपये पाण्यात गेले आहेत. सुशिक्षित बेरोजगार व महिला बचतगटात याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. डहाणूच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर रोज तसेच सुट्टी व सणासुदीच्या दिवसात गुजरात तसेच महाराष्ट्रभरातील हजारो पर्यटक येतात परंतु या परीसरात त्यांना हवे असलेले खाद्य पदार्थ रास्त दरात मिळत नाहीत व मोठ्या हॉटेलमधील पदार्थांचे दर परवडत नाहीत परीणामी येथे येणाऱ्या पर्यटकांची सोय व्हावी व परिसरातील स्थानिक महिला बचतगटांचे सक्षमीकरण व्हावे व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने डहाणू नगरपरिषद तसेच वनव्यवस्थापन समिती (डहाणू) यांनी सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत १९ लाख पंचवीस हजार रूपये खर्च करून हे स्टॉल उभारले परंतु गेल्या चार पाच वर्षापासून त्याचे वाटप महिलाबचत गटाना करण्यात न आल्याने ते धूळखात पडले व त्याची पार दुर्दशा झाली आहे.
महिला बचतगट सक्षमीकरण होणे तर दुरच राहिले उलट शासनाचे २० लाख रूपये मात्र डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे वाया गेले आहेत.
(वार्ताहर)
>पर्यटन स्टॉल महिलाबचत गटाना देण्यासाठी तीन वेळा निविदा काढण्यात आली परंतु प्रतिसाद मिळत नाही शिवाय रात्रीच्या सुमारास येथे अनैतिक कृत्य होत असल्याची तक्रार नगरसेवकानी केल्याने स्टॉल्सच्या लाकडी फळया काढून ठेवण्यात आलेले आहेत.
-विनोद डवले, मूख्याधीकारी,
डहाणू नगर परिषद