दहीहंडीचा जल्लोष, गोविंदाच्या मृत्यूने गालबोट; पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 06:11 AM2018-09-04T06:11:32+5:302018-09-04T06:31:44+5:30
‘ढाक्कुमाकुम’चा गजर, पिपाण्या वाजवत - जल्लोष करीत निघालेली मंडळे, सलामीवेळचा थरार अशा वातावरणात मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला.
मुंबई/ठाणे : ‘ढाक्कुमाकुम’चा गजर, पिपाण्या वाजवत - जल्लोष करीत निघालेली मंडळे, सलामीवेळचा थरार अशा वातावरणात मुंबईसहठाणे जिल्ह्यात सोमवारी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला. गेल्या दोन वर्षांत आलेली मरगळ झटकत गोविंदांनी नऊ थरांची सलामी दिली.
पावसाने दडी मारल्याने त्यांचा विरस झाला असला, तरी कृत्रिम फवाऱ्यांनी त्याची कसर भरून काढली. हंडीच्या थरावरून पडून एका गोविंदाचा झालेला मृत्यू व वेगवेगळ्या दुर्घटनांत १५० गोविंदा जखमी झाल्याने उत्सवाच्या उत्साहाला काहीसे गालबोट लागले. बहुतेक आयोजकांनी पाच थरांची मर्यादा ठेवत, दहीहंडी पारंपरिक पद्धतीने साजरी केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत यंदाही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधिक हंड्यांचे आयोजन केल्याचे दिसले. पारितोषिकाच्या रकमेत यंदाही आयोजकांनी आखडता हात घेतला.
काही मंडळांनी बक्षिसांच्या रकमेत कपात करत, संबंधित रक्कम केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याची घोषणा करत सामाजिक बांधिलकी जपली. हंडी फोडण्यासाठी १४ वर्षांवरील गोविंदांची निवड, हंडी फोडणाºया गोविंदाला सेफ्टी हेल्मेट-जॅकेट- सुरक्षेचा दोर अशा विविध सुरक्षा साधनांना आयोजकांसह गोविंदा पथकांनी प्राधान्य दिले.
एका गोविंदाचा मृत्यू
धारावीतील बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवात कुश खंदारे या २६ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. पहिल्या थरावर चढताना त्याला आकडी आली. त्याला उपचारांसाठी त्वरित सायन रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारांपूर्वीच वैद्यकीय अधिकाºयांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
जय जवानचे नऊ थर :
स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने अत्यंत सफाईदारपणे नऊ
थर रचून सलामी दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.
149 एकूण जखमी गोविंदा
70 उपचार घेणारे
79 उपचार घेऊन घरी गेलेले