कायदेभंग आणि जोशभंग यांनी गाजवला दहीकाला
By Admin | Published: August 26, 2016 02:55 AM2016-08-26T02:55:53+5:302016-08-26T02:55:53+5:30
न्यायालयाच्या निर्बंधांमुळे शिवसेना, भाजपाचे नेते व लोकप्रतिनिधींच्या दहीहंड्यांवर जोशभंगाचे सावट होते
ठाणे : न्यायालयाच्या निर्बंधांमुळे शिवसेना, भाजपाचे नेते व लोकप्रतिनिधींच्या दहीहंड्यांवर जोशभंगाचे सावट होते, तर कायदेभंगाचा विडा उचललेल्या मनसेच्या दहीहंडीत उन्माद, उत्साह ठासून भरला असला तरी कायदा धाब्यावर बसवण्याचा औचित्यभंग घडला.
ठाण्यात दोन वर्षांपूर्वीपर्यंत दहीहंडीच्या उत्सवाला स्पर्धा, अहमहमिका यामुळे लढाईचे स्वरूप यायचे. सेलिब्रिटींपासून थरांपर्यंत सर्वच बाबतीत तीव्र स्पर्धा पाहायला मिळायची. न्यायालयाचे निर्बंध आल्यापासून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दहीहंडीतून काढता पाय घेतला. त्यामुळे यंदा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक व आमदार रवींद्र फाटक यांच्या हंड्यांमध्ये गोविंदा पथकांची गर्दी व उत्साह असला तरी जोश दिसला नाही. मनसेच्या दहीहंडीच्या ठिकाणी पोलीस, मीडिया आणि सर्वच मंडळींचे लक्ष लागले होते. कारण, ‘नऊ थर व ११ लाखांचे बक्षीस’ असे फलक मनसेने लावले होते. याखेरीज, ‘तुम्ही तयारीला लागा, न्यायालयाचे मी पाहतो’, असे न्यायालयाला आव्हान देणारे फलकही लावले होते. त्यामुळे या दहीहंडीच्या ठिकाणी सकाळपासून उन्मादाचे दर्शन घडले.
जय गणेश, आम्ही कोपरीकर, जागृत हनुमान मंडळ, किसननगरचा राजा, अष्टविनायक मित्र मंडळ, ओमसाई गोविंदा पथक, नवतरुण मित्र मंडळ, जय मल्हार, एकता, कोपरीचे कृष्ण गोविंदा, एकवीरादेवी या पुरुष गोविंदा पथकांसह शिवतेज, वाघबीळचा राजा, पार्ले स्पोर्ट्स क्लब अशा महिला गोविंदा पथकांनीही इथे हजेरी लावत विविध थरांची दणक्यात सलामी दिली. जय जवान आणि शिवसाई या दोन पथकांनी नऊ थर लावून न्यायालयाच्या आदेशांचा भंग करण्याचे मनसेचे मनसुबे पूर्ण केले.
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या गोविंदांना सहभागी करू नका तसेच सर्वात वरच्या थरावरील गोविंदाला सेफ्टी बेल्ट लावण्याचे आवाहन आयोजकांमार्फत सातत्याने केले जात होते. मात्र, काही पथकांनी बालगोविंदांचे वय सांगणे टाळले.
उन्हामुळे काही गोविंदांना चक्कर आली. मात्र, आयोजकांकडून पाणी आणि प्रथमोपचाराची सोय केली असल्याने गंभीर घटना घडल्या नाहीत.