दररोज आॅनलाइन साई दर्शनपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2016 06:51 AM2016-10-12T06:51:39+5:302016-10-12T06:51:39+5:30
दर्शनाच्या वेळेत आता कुणीही ओळखपत्र दाखवून पास काढू शकेल़ आॅनलाइन पासेसची तीन दिवसांची मर्यादा हटविण्यात आल्याची घोषणा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे
शिर्डी : दर्शनाच्या वेळेत आता कुणीही ओळखपत्र दाखवून पास काढू शकेल़ आॅनलाइन पासेसची तीन दिवसांची मर्यादा हटविण्यात आल्याची घोषणा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी मंगळवारी केली़
वयोवृद्ध व अपंगांबरोबरच यापुढे ज्या कुटुंबाबरोबर एक वर्षाच्या आतील मूल आहे, त्या कुटुंबाला विनाशुल्क झटपट दर्शन मिळणार आहे़ सोमवारपासून दर्शनरांगेत भाविकांना मोफत चहा, दूध, कॉफी, बिस्किटे देण्यात येत आहेत़ लवकरच या रांगेत वॉटर प्युरिफायर बसवण्यात येणार आहेत़
‘साई अॅम्ब्युलन्स’ योजनेसाठी मंगळवारी धरम कपाडिया यांनी एक, तर धरम कटारिया यांनी दोन रुग्णवाहिका देण्याचे जाहीर केले़ आतापर्यंत या योजनेसाठी २४ लाख रुपये जमा झाले असून, दोनशे भाविकांनी यासाठी तयारी दर्शवली असल्याचे डॉ़ हावरे यांनी सांगितले़
संस्थानचे प्रकाशन असलेल्या सर्व ग्रंथ व पुस्तकांच्या किमतीत २० टक्के कपात करण्याचा निर्णयही व्यवस्थापनाने घेतला़ जगभरातील साई मंदिरांच्या विश्वस्तांचे ४ डिसेंबरला शिर्डीत चर्चासत्र आयोजित केले असून, यातून शताब्दीच्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण करण्याबरोबर शताब्दी वर्षात विशिष्ट कार्यक्रम राबविण्याचाही निर्णय घेतला जाणार आहे़ (प्रतिनिधी)