आरे दूध डेअरीतील दुग्ध उत्पादन अखेर सुरू
By Admin | Published: June 13, 2016 02:33 AM2016-06-13T02:33:03+5:302016-06-13T02:33:03+5:30
गोरेगावच्या आरे दूध डेअरीतील दुग्ध उत्पादन अखेर गेल्या मंगळवारी (दि.७ जून)च्या सुमारास सुरू झाले.
मुंबई : गोरेगावच्या आरे दूध डेअरीतील दुग्ध उत्पादन अखेर गेल्या मंगळवारी (दि.७ जून)च्या सुमारास सुरू झाले. कामगार नेते सुरेश खंडागळे आणि अफझल नशिददार यांनी
रात्री ११च्या सुमारास मशिनची कळ दाबून हे बहुप्रतीक्षित दुग्ध उत्पादन सुरू केले.
या प्रसंगी मध्यवर्ती दुग्धशाळा आरे येथील प्रताप सकपाळ, सदस्य सुरेश घोलप, नारायण घाडगे, माधवन रामस्वामी आणि कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या संदर्भात ‘लोकमत’ने गेल्या शनिवार (दि. ५ जून) रोजी वृत्त दिले होते. आरे दूध डेअरीतील चिलपॉवर खात्यातील कॉम्प्रेसर मोटर नादुरुस्ती झाल्याने २५ मे पासून येथील रोजचे सुमारे १० ते १२ हजार लीटर दुग्ध उत्पादन ठप्प झाले होते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आरे प्रशासनाने जलदगतीने क्रेन लाऊन येथील नादुरुस्त कॉम्प्रेसर मोटर दुरुस्त करण्यासाठी कंबर कसल्याची माहिती येथील कामगारांनी दिली. येत्या आठ दिवसांत येथील कॉम्प्रेसर मोटर दुरुस्त झाली नाही आणि येथील दुग्ध उत्पादन पुन्हा सुरळीत न झाल्यास संपूर्ण आरे वसाहतीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील दोन्ही युनियनच्या नेत्यांनी प्रभारी व्यवस्थापक गजानन राऊत यांना दिला होता. दोन्ही संघटनांच्या प्रयत्नाने येथील आरे डेअरीचे उत्पादन सुरू झाल्यामुळे येथील ५०० कामगारांनी आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)