दुष्काळ निवारणासाठी संघ ‘दक्ष’!
By Admin | Published: December 10, 2015 02:23 AM2015-12-10T02:23:25+5:302015-12-10T02:23:25+5:30
राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दोन नद्यांना पुनर्जीवन देऊन ६० गावांमध्ये बंधारे बांधण्याचा संकल्प संघाने केला आहे.
मुंबई : राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दोन नद्यांना पुनर्जीवन देऊन ६० गावांमध्ये बंधारे बांधण्याचा संकल्प संघाने केला आहे.
जल संवर्धन करणाऱ्या २३ संस्थांच्या मदतीने दुष्काळग्रस्त भागात बंधारे बांधणे, जल आराखडा तयार करणे, नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यांचे पुनरूज्जीवन करण्याची कामे संघ करणार असल्याचे संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत सांगितले. कुलकर्णी म्हणाले की, १२ जिल्ह्यांमध्ये सात कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्पांचे नियोजन केले आहे. शिवाय औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांचा गट सक्रीय झाल्याचेही त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त भागात चाऱ्यांची समस्या मोठी गंभीर असल्याने पुढील १८० दिवस विविध ७० चारा
डेपोंच्या माध्यमातून पशूखाद्य पुरवणार असल्याचेही संघाने
स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याच्या बचतीचे आणि संवर्धनाचे उपाय सांगणारे जनजागृतीपर उपक्रम राज्यातील ५०० गावांमध्ये राबवण्याचे कामही संघाचे स्वयंसेवक करणार आहेत.
शिवाय दुष्काळग्रस्त भागांतील जे विद्यार्थी शहरात शिकतात, त्यांच्यासाठी पुढील सहा महिने भोजनाची सोयही संघ करणार असल्याचे सेवा विभागाने सांगितले.
> दोन नद्यांना मिळणार पुनरूज्जीवन : संघाने हाती घेतलेल्या उपक्रमात राज्यातील दोन नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयोग संघ करणार आहे. त्यात सांगलीची अग्रणी नदीसह पैठण तालुक्यातील येळ गंगाजवळील नदीचा समावेश आहे.
कर्जमाफी नाही मागणार : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करणार नसल्याचेही संघाने सांगितले. लोकांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिकाही संघाने स्पष्ट केली. त्यासाठीच लोकांनी या उपक्रमात सामील होऊन आणि औद्योगिक संस्थांनीही आर्थिक मदत करून, उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन संघाने केले आहे.