आखाती देशांत दुतोंड्या सापांची तस्करी
By admin | Published: July 10, 2016 09:05 PM2016-07-10T21:05:16+5:302016-07-10T21:05:16+5:30
आखाती देश विशेषत: सौदी अरबमध्ये दुतोंड्या (मांडुळ) सापांची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका दुतोंड्या सापासाठी किमान २० ते २५ लाख रुपये तस्करांना मिळत
गणेश वासनिक
अमरावती: आखाती देश विशेषत: सौदी अरबमध्ये दुतोंड्या (मांडुळ) सापांची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका दुतोंड्या सापासाठी किमान २० ते २५ लाख रुपये तस्करांना मिळत असून मुंबईमार्गे आखाती देशांत हे साप पाठविले जातात. दुतोंड्या सापांचा गुप्त धन शोधण्यासाठीदेखील वापर केला जात असल्याचे बोलले जाते.
दुतोंड्या साप बिन विषारीमध्ये गणला जातो. अतिशय लाजाळू असा सरपटणारा हा प्राणी. वनविभागात प्राण्यांच्या वर्गवारीत दुतोंड्या सापाची नोंद वर्ग १ मध्ये करण्यात आली आहे.
परंतु या सापाच्या पाठीच्या कण्याचे हाड उत्तेजनवर्धक औषधी निर्मितीसाठी वापरल जात असल्याची माहिती आहे. दुतोंड्या सापाच्या हाडापासून निर्मित औषधांना आखाती देशात प्रचंड मागणी असल्याचे एक वनाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, दुतोंड्या सापाच्या तस्करीत वाढ होते. ज्याप्रमाणे वाघांच्या तस्करीचे जाळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विणलेले आहे, त्याच धर्तीवर दुतोंड्या सापाची मागणी आहे. राज्यात दुतोंड्या साप पठारी भागात आढळतो.
विशेषत: मेळघाटच्या धारणी जंगलात या सापाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने तस्कर स्थानिकांना हाताशी धरून दुतोंड्या सापाची तस्करी करीत असल्याची माहिती आहे. अमरावतीतील वडाळी वनपरिक्षेत्राही दुतोंड्या सापाचे अधिवास आहे. या सापाच्या पाठीच्या कण्याचे हाडापासून उत्तेजनवर्धक औषधी निर्मित केली जात असून या औषधीला आखाती (गल्फ) देशांत प्रचंड मांगणी आहे. दुतोंड्या सापांची संख्या कमी असून पठारी भागातच त्यांचा अधिवास आहे. त्यामुळे दुतोंड्या सापांचे तस्कर स्थानिक नागरिक अथवा सर्पमित्रांशी व्यावहारिक संपर्क ठेवून आहेत. हा साप विषारी नसला तरी त्याचे हाड अतिशय लाभदायी असल्याचे तज्ज्ञांचेदेखील म्हणणे आहे. काही सर्पमित्रांकडे दुतोंड्या साप असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ५ ते ११ किलो वजनाच्या दुतोंड्या सापाची आखाती देशात सर्वाधिक मागणी असल्याचे बोलले जात आहे. गत आठवड्यात दुतोंड्या साप वसा गु्रपला आढळला असून तो वडाळी वनपरिक्षेत्रात सोडण्यात आल्याची नोंद आहे. या सापाची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाची करडी नजर आहे.
अंधश्रद्धेच्या नावाने दलाल सक्रिय
हल्ली पावसाळा सुरू झाला असून सापांचा मुक्त संचार वाढला आहे. काहींनी दुतोंड्या सापाच्या नावाने अंधश्रद्धा पसरविण्यात आघाडी घेतली आहे. यात दुतोंड्या सापाची विक्री करणारे दलालदेखील सक्रिय झाले आहेत. दुतोंड्या साप घरी अथवा परिसरात आढळल्यास संपर्क साधण्यासाठी जणू स्पर्धा असल्याचे चित्र आहे. मेळघाटात या सापाबद्दल समज- गैरसमज पसरविण्यात आले आहे.
तस्करांच्या भाषेत दुतोंड्या नव्हे तर ‘इंजन’
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की दुतोंड्या सापाच्या तस्करीत वाढ होते. या सापाच्या तस्करीसाठी तस्करांकडून विशेष शब्दप्रयोग केला जातो. स्थानिकांसोबत या सापाची मागणी करीत असताना तस्कर दुतोंड्यासाठी ‘इंजन’ अशा टोपन नावाने शब्दप्रयोग करीत असल्याची माहिती आहे. समोरील भागात दोन तोंड असलेल्या सापाची विदेशात तस्करी होते.
‘‘ दुतोंड्या सापाची तस्करी होणे ही बाब अतिशय धक्कादायक आहे. जंगलात प्राण्यांचा मुक्त संचार असणे, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु कोणी या सापाची तस्करी अथवा सहभागी असल्याचे निदर्शनास येताच कठोर कारवाई केली जाईल.
- दिनेशकुमार त्यागी,
क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प
दुतोंड्या सापाला शेपटाकडूनही तोंड राहते. त्याचे हाड कशात वापरतात, हे ज्ञात नाही. हा साप विषारी नसतो. मात्र कोबरा सापाचे विष औषधीसाठी वापरण्यात येत असल्याची माहिती आहे.
- सी.के. देशमुख, विभागप्रमुख, प्राणीशास्त्र अमरावती विद्यापीठ.
‘‘विदेशात दुतोंड्या सापाच्या हाडापासून महागडी औषध निर्माण करीत असल्याचे बोलले जाते. गुप्तधन शोधणे अथवा अंधश्रद्धा पसरविण्यासाठी देखील या सापाचा वापर करतात. मात्र वैज्ञानिक दृष्ट्या तसा काहीही आधार नाही.
निलेश कंचनपुरे
सर्पमित्र, अमरावती