दलित नेते एकनाथ आवाड कालवश
By Admin | Published: May 25, 2015 10:01 AM2015-05-25T10:01:56+5:302015-05-25T10:49:26+5:30
मराठवाड्यातील दलित नेते अॅड. एकनाथ आवाड यांचे सोमवारी सकाळी हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २५ - मराठवाड्यातील दलित नेते अॅड. एकनाथ आवाड यांचे सोमवारी सकाळी हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. आवाड यांच्या निधनाने दलित चळवळीत पोकळीत निर्माण झाली अशी भावना व्यक्त होत आहे.
बीडमधील एका छोट्या गावात एकनाथ आवाड यांचा जन्म झाला होता. मातंग समाजात जन्मलेले एकनाथ आवाड यांचे बालपण हलाखीच्या स्थितीत गेले. जातीव्यवस्थेचे चटके सोसत आवाड यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. पोतराज प्रथेला विरोध दर्शवत आवाड यांनी दलितांसाठी पहिला लढा दिला. यानंतर जातीभेद, नामांतर चळवळ, सावकारकी, एक गाव एक पाणवठा असे असंख्य लढे त्यांनी दिले. मानवी हक्क अभियान या मोहीमेतून आवाड यांनी ५० हजार दलितांच्या जमिनी वाचवल्या. संयुक्त राष्ट्राच्या जिन्हिवा येथील राष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
गेल्या काही दिवांपासून आवाड यांना पोटाच्या आजाराने ग्रासले होते. यासाठी त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.