दलित हत्याकांडाचे गूढ कायम
By admin | Published: October 23, 2014 02:42 AM2014-10-23T02:42:17+5:302014-10-23T14:52:41+5:30
तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघा जणांची क्रूरपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यच हादरले आहे.
पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघा जणांची क्रूरपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यच हादरले आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या मुळाशी पोहचण्यात पोलीस अद्याप यशस्वी झालेले नाहीत.
सोनई व खर्डा येथील दलित हत्येचे प्रकरण ताजे असतानाच जवखेडे खालसा येथील हत्याकांडाने सर्वांनाच धक्का बसला आहे. घटनेमागे एखादे नाजूक प्रकरण असावे, त्या दिशेने प्राथमिक तपास सुरू असला तरी अन्य कारणेही तपासली जात आहेत. मात्र, त्याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दिवसभरात अनेक नेते व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गावात मोठा बंदोबस्त लावण्यात आल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.
गावामध्ये जाधव वस्तीवर संजय जाधव यांचे वडील रहातात. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, खा. दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे यांच्यासह दलित चळवळीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे आले होते.
नगर जिल्ह्यात सातत्याने दलितांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नगर दलित अत्याचार ग्रस्त जिल्हा जाहीर करावा, अशी मागणी खा. आठवले यांनी केली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा छडा लावून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे हांडोरे म्हणाले. भाजपाच्या वतीने कुटुंबाला एक लाख रूपयांची मदत खा. गांधी यांनी जाहीर केली.
नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत दलित हत्याकांडाच्या घटना वारंवार घडत आहेत. जवखेडे खालसा येथील हत्याकांडाने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्थेसह सामाजिक सलोख्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संजय जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) व सुनील संजय जाधव (१९) यांची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेहाचे तुकडे विहिरीत टाकल्याची भीषण घटना मंगळवारी उघडकीस आली होती. जाधव कुटुंब सुस्वभावी होते. त्यांचा कोणाशीही वाद नव्हता. (प्रतिनिधी)