राज्यातील १२५ गावांतील दलित वस्त्यांचे रुपडे पालटणार

By Admin | Published: August 14, 2016 02:23 AM2016-08-14T02:23:29+5:302016-08-14T02:23:29+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील १२५ निवडक गावांतील दलित वस्त्यांचा (अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये) सर्वांगीण विकास करण्यासाठी

The dalit settlements of 125 villages in the state will change | राज्यातील १२५ गावांतील दलित वस्त्यांचे रुपडे पालटणार

राज्यातील १२५ गावांतील दलित वस्त्यांचे रुपडे पालटणार

googlenewsNext

- आनंद डेकाटे,  नागपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यातील १२५ निवडक गावांतील दलित वस्त्यांचा (अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये) सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने विशेष योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, गटार बांधणी, वीजपुरवठा, विद्युत पथदिवे, सोलर दिवे, सार्वजनिक विहीर खोदाई व दुरुस्ती, समाज मंदिर बांधणे, जुने समाज मंदिर असल्यास दुुरुस्ती करणे, समाज मंदिरात वाचनालय, संगणक केंद्र (इंटरनेटसह) व्यवसाय प्रशिक्षण शाळा, व्यायाम शाळा (सर्व साहित्यासह) व छोटे सुसज्ज सभागृह असावे उभारण्यात येणार आहे. समाज मंदिरात महिला बचत गट प्रशिक्षणवर्ग, आरोग्य शिबिरे, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार व प्रसार कार्यशाळा, कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, महामंडळाच्या योजना, कौशल्य विकासावर आधरित प्रशिक्षण कार्यक्रम यांची एकत्रित अंमलबजावणी करणे, वस्तीतील युवकांसाठी युवा नेतृत्व शिबिर व कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण देणे, आदी कामे दलित वस्तीमध्ये केली जातील. ही संपूर्ण विकास कामे दोन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत.
राज्यातून १२५ गावांची निवड करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री उपाध्यक्ष राहतील. उपसचिव हे सदस्य सचिव राहतील. तर सचिव आणि समाज कल्याण आयुक्त हे सदस्य राहतील. येत्या १५ दिवसात या समितीला गावांची निवड करावयाची आहे.

निवड झालेल्या गावांना महापुरुषांची नावे
राज्यातील ज्या १२५ गावांमधील दलित वस्त्यांची निवड केली जाईल, त्या वस्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास ग्राम, संत रोहिदास विकास ग्राम, सावित्रीबाई फुले विकास ग्राम, राजर्षी शाहू महराज विकास ग्राम, महात्मा फुले विकास ग्राम, रमाई आंबेडकर विकास ग्राम, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास ग्राम आदी महापुरुषांची नावे देण्यात यावी, असे आदेशही शासनाने बजावले आहेत.

Web Title: The dalit settlements of 125 villages in the state will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.