राज्यातील धरणे ६५ टक्केच : मराठवाडा-विदर्भ अजूनही तहानलेलाच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 12:54 PM2019-09-03T12:54:28+5:302019-09-03T12:58:16+5:30
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश तालुक्यात सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस ऑगस्ट अखेरीस झाला आहे..
पुणे : पश्चिम महाराष्ट्र वगळता मराठवाडा आणि विदभार्तील बहुतांश धरणात अजूनही पाण्याचा खडखडाट आहे. राज्यातील धरणांमधे १४४४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची क्षमता असून, सोमवार (दि.२) अखेरीस त्यात ९३२.१४ टीएमसी (६४.५५ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात ६५.३४ टक्के पाणीसाठा होता. कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील धरणेच जलयुक्त झाली असून, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांत उपयुक्त साठा अत्यल्प आहे.
जून महिन्यात मॉन्सून कोरडा गेल्यानंतर जुलैचा शेवटचा आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाची धरणे भरली आहेत. कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यातील कोयना, राधानगरी, वारणावती, दूधगंगा, भाटघर, नीरा देवघर, वीर, पानशेत, वरसगाव, मुळशी, पवना, डिंभे, चासकमान ही धरणे भरली आहेत. भीमा खोऱ्यातील धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या उजनीत ११७.४७ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा झाला आहे.
औरंगाबाद विभागाची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी (पैठण) धरणात गोदावरीतील पाणी जमा झाल्याने यंदा धरणात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला होता. या धरणाची क्षमता १०५ टीएमसी असून, ७६.६५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या या धरणा ६५.५६ टीएमसी उपयुक्तपाणीसाठा आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी वरदायिनी ठरलेल्या वैनगंगेवरील गोसी खूर्द प्रकल्पात १६.२७ टीएमसी (६२.२७ टक्के) पाणीसाठा आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश तालुक्यात सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस ऑगस्ट अखेरीस झाला आहे. अमरावती विभागात अवघा ५०.८२ टीएमसी (३४.३२ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात येथे ५५.६७ टक्के पाणीसाठा होता.
औरंगाबाद विभागामध्ये ७९.८० टीएमसी (३०.६६ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी तो २८ टक्के होता. नागपूर विभागामधे ८७.१९ टीएमसी (५३.६ टक्के) पाणीसाठा असून, गेल्यावर्षी तो ४९.८८ टक्के होता. या भागामधे यंदा देखील पाणीटंचाई जाणवेल अशीच स्थिती आहे.
अमरावती विभागातील काटेपूण, इसापूर, अरुणावती आणि पूस धरणातील पाणीसाठा २० टक्के देखील नाही. औरंगाबाद विभागातील मांजरा, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर, निम्न तेरणा, सिना कोळेगाव आणि निम्न दुधना प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा अजूनही शून्य आहे. नागपूर विभागातील बावनथडीमधे साडेपाच, दिना शून्य, खिडसी १७.२९ आणि तोतलाडोह ३८, कामठी खैरी २९.५९, निम्न वर्धा ४६, बोर धरणात ४२.३१ टक्के पाणीसाठा आहे.