दमणगंगा-पिंजाळचा जुना करार रद्द, ठाणे-भिवंडी बायपास आठ पदरी बनविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:46 AM2017-09-09T04:46:57+5:302017-09-09T04:47:04+5:30
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आघाडी सरकारच्या काळात दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्पाबाबत झालेला करार रद्द करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू व्हावे, अशी गुजरातची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्र सरकारचे काही आक्षेप होते. आता त्या बाबत महाराष्ट्राचे समाधान होईल, असा निर्णय घेऊन ५० टीएमसी पाणी गोदावरी खो-यात वळविले जाईल आणि त्याचा फायदा मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला तसेच मुंबईलादेखील होईल. या भागातील मोठी धरणे त्यामुळे दरवर्षी १०० टक्के भरतील, असे केंद्रीय जलसंपदा व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र परिषदेत सांगितले.
पार-तापी योजनेचा फायदा नाशिक, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना होणार आहे. विदर्भातील अत्यंत महत्त्वाकांक्षी असा गोसीखुर्द सिंचन प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प आहे. राज्य सरकारने त्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ ची डेडलाइन ठरविली आहे. तथापि, आज गडकरी यांनी आम्हाला हे काम ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईतील रस्त्यांच्या दर्जा सुधारण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास आपला विभाग तयार आहे, असे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. रस्ते बांधताना वा दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान महापालिकेने वापरायला हवे, असा सल्ला गडकरींनी दिला.
...तर राहुल गांधींना ५ हजार कोटी देऊ-
राज्य सरकारची कर्जमाफी फसवी असून ३५ हजार कोटी नव्हे तर ५ हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे, असा आरोप कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी राहुल गांधी यांना ५ हजार कोटी रुपये देतो. त्यांनी राज्यातील शेतकºयांचे कर्ज माफ करून दाखवावे. आमची कर्जमाफी ही देशातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असा दावाही त्यांनी केला.
ठाणे-भिवंडी बायपास आठ पदरी बनविणार-
ठाणे-भिवंडी बायपास हा आठ पदरी बनविण्यात येईल आणि त्यासाठीच्या निविदा येत्या तीन महिन्यांत काढण्यात येतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेच्या कामाच्या पाच निविदा काढण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प ४४ हजार कोटी रुपयांचा आहे. या मार्गावरील वर्सोवा ब्रिजच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. त्याला पर्यावरणविषयक मंजुरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आजच दिलेले आहेत. येत्या दीड महिन्यात ते काम सुरू होईल, असे गडकरी यांनी एका प्रश्नात सांगितले.