डमी भाऊसाहेब हाकताहेत गाडा
By Admin | Published: July 23, 2016 01:51 AM2016-07-23T01:51:56+5:302016-07-23T01:51:56+5:30
तलाठी कार्यालयात हमखास तलाठी भेटणे दुर्लभ असले, तरी तुमची सर्व कामे तुम्हाला पाहिजे त्या वेळी चुटकीसरशी करता येतात.
टीम लोकमत,
तळेगाव दाभाडे- तलाठी कार्यालयात हमखास तलाठी भेटणे दुर्लभ असले, तरी तुमची सर्व कामे तुम्हाला पाहिजे त्या वेळी चुटकीसरशी करता येतात. फक्त यासाठी तुम्हाला तो मागेल तेवढे पैसे मोजावे लागतात. डमी भाऊसाहेब म्हणजे तलाठ्याने स्वत:ची कामे करण्यासाठी ठेवलेला कामगार. एका तलाठ्याकडे साधारण गावांच्या लोकसंख्येनुसार तीन ते चार गावे असतात. जितकी गावे आहेत, तेवढे कामगार म्हणजेच डमी भाऊसाहेब तो ठेवतो.
>ठिकाण : वडगाव मावळ वेळ : स. १०
प्रतिनिधी : भाऊसाहेब कुठे आहेत?
डमी भाऊसाहेब : भाऊसाहेब आॅनलाइन प्रशिक्षणाला गेले आहेत.
प्रतिनिधी : जमिनीवरील कूळ काढायचे आहे.
डमी भाऊसाहेब : साताबारा घेऊन या, किती खर्च ते सांगतो.
(प्रतिनिधी कार्यालयातून बाहेर पडतात. एवढ्यात डमी भाऊसाहेबांनी ठेवलेला एक जण बाहेर येतो.)
प्रतिनिधी : जमिनीवर बोजा चढवायचा आहे.
डमी भाऊसाहेबाचा सहायक : घेऊन या सातबारा, लगेच करून देतो.
>ठिकाण : तळेगाव दाभाडे वेळ : दु. १२
प्रतिनिधी : तलाठी भाऊसाहेब कुठे आहेत?
डमी भाऊसाहेब : आॅनलाइनच्या कामासाठी बावधनला गेले आहेत.
प्रतिनिधी : जमीन खरेदीची नोंद करायची आहे.
डमी भाऊसाहेब : दोन महिने लागतील.
प्रतिनिधी : त्यासाठी किती पैसे द्यावे लागतील?
डमी भाऊसाहेब : भाऊसाहेबच सांगतील खर्च किती ते.
तलाठी कार्यालय तळेगाव दाभाडे येथे गेलो असता तलाठी कार्यालयात भाऊसाहेबच नव्हते. कारकुनला विचारले असता भाऊसाहेब/ अथवा तलाठी बावधन आॅनलाइनची कामे करतात.
दुसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीने जमीन घेतली असता त्याची नोंद करण्यासाठी २ महिने लागतात, असेही कारकुनांनी सांगितले. पैसे विचारले असता भाऊसाहेबांनाच माहिती आहे, असे सांगितले.
>वारसनोंद करण्यासाठी कायदेशीर व विनाकायदेशीर हवे ते नाव टाकणे किंवा वगळण्यासाठी ५००० ते ५०००० रुपये
विविध दाखले देणे, रेशनिंग
कार्डवर नावे चढवणे कमी करणे, उत्पन्नाचे दाखले देणे , कर्जबिलं, बाकीचे दाखले देणे यासाठी १०० ते १००० रुपये.
नोंद करण्यासाठी सरकारी कालावधी १५ दिवस असताना डमी भाऊसाहेब ही कामे ८ दिवसांत करतात.
सातबाऱ्याचे फेरफार काढण्यासाठी ते किती महत्त्वाचे आहेत? किती दिवसांत पाहिजेत? समोरील माणूस पाहून पैसे घेतले जातात.
छोटे व्यवहार असतील, तर हे कार्यालयातच होतात. मोठे व्यवहार असतील, तर कार्यालयाबाहेरील चहाची टपरी, हॉटेल किंवा ढाब्यांवर होतात. पैसे देवाणघेवाणासाठी विशिष्ट व्यक्तींचा वापर केला जातो.
हे डमी भाऊसाहेब तलाठ्याची सर्व कामे करत असून, यातून मिळणाऱ्या अवैध कमाईचा काही वाटा तलाठी या भाऊसाहेबांना देतात. इस्टेट एजंट, शेतकरी व नागरिक तलाठ्यापेक्षा या डमी भाऊसाहेबांची मर्जी सांभाळण्यासाठी मोठा खर्च करतात.
तलाठी कार्यालयातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे व इतर दस्तावेज हे सहजपणे हाताळतात. तलाठी भाऊसाहेबांना जेवढी आपल्या भागाची माहिती नसते, त्यापेक्षा जास्त इत्थंभूत माहिती या डमी भाऊसाहेबांकडून मिळते.
>ठिकाण : करंजगाव, वेळ : दु. १२.३०
प्रतिनिधी : भाऊसाहेब दिसत नाहीत.
डमी भाऊसाहेब : नाहीत हो. बोला काय काम?
प्रतिनिधी : जमिनीवर नाव लावायचे आहे. किती दिवस लागतील?
डमी भाऊसाहेब : नाव येण्यासाठी २५ दिवस लागतात. तांत्रिक अडचण आल्यास दीड महिना लागतो.
प्रतिनिधी : किती खर्च येईल?
डमी भाऊसाहेब : पंधरा हजार द्या, तुमची सगळी कामे करतो.
आता आॅनलाइन प्रक्रिया असल्यामुळे उताऱ्यावर नवीन खरेदीदाराचे नाव येण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागतो. परंतु, काही तांत्रिक अडचणी आल्यास दीड ते दोन महिनेही लागतात, असं त्याच्याकडून सांगण्यात आलं. आणि खर्च किती येईल? यावर त्यांनी १५००० खर्च येईल, असे संगितले.