ती भेट शेवटची : 'दामिनी' प्रतीक्षा लोणकर यांनी जागवल्या रमेश भाटकर यांच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 06:44 PM2019-02-04T18:44:18+5:302019-02-04T18:48:42+5:30
एखादी व्यक्ती आयुष्यात सहकलाकार म्हणून येते मात्र व्यक्ती म्हणून तिचा मोठेपणा कायम मनावर कोरला जातो अशा शब्दात 'दामिनी'फेम मालिकेच्या कलाकार प्रतिक्षा लोणकर यांनी दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्या आठवणी जागवल्या.
नेहा सराफ - कंकरेज
पुणे : एखादी व्यक्ती आयुष्यात सहकलाकार म्हणून येते मात्र व्यक्ती म्हणून तिचा मोठेपणा कायम मनावर कोरला जातो अशा शब्दात 'दामिनी'फेम मालिकेच्या कलाकार प्रतिक्षा लोणकर यांनी दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्या आठवणी जागवल्या.
त्या म्हणाल्या की, दामिनीच्या मालिकेत तशी भाटकर यांची इंट्री उशिरा झाली. ते आले तेव्हा मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर होती. त्यावेळी माझं (दामिनीचं) किरण करमरकर साकारत असलेल्या पात्रावर प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं होत. मात्र अचानक भाटकर साकारत असलेल्या पात्राशी लग्न होतं आणि मालिकेला नवं वळण मिळत. मात्र आमच्या जोडीला प्रेक्षकांनी उचलून धरलं, इतकंच नव्हे आमचे सीनही आवडल्याचे अनेकजण सांगायचे. त्यामुळे कलाकार म्हणून आम्हाला एकत्र काम करताना खूप आनंद मिळाला. आमच्या त्या काळातल्या अनेक आठवणी मनात रुंजी घालत आहेत. एकदा दिग्दर्शक सीन समजावत असताना ते अचानक मागे धूळ झटकायचा फडका मारू लागले. ते काय करतात असं विचारल्यावर म्हणाले, ' आता दामिनी अवधी करारी असेल तर तिच्या नवऱ्याला तर फडकाच मारावा लागणार ना' !त्यांच्या या वाक्याने सेटवर हशा पिकला होता. छान खेळकर वातावरणात काम करण्याची त्यांची सवय सहकलाकार म्हणून लक्षात राहणारी आहे.
व्यक्ती म्हणून बोलायचं झाल्यास ते त्या काळी इन्स्पेक्टर, कलेक्टर अशा भूमिका करायचे. त्यांच्या हँडसम दिसण्यामुळे अनेक मुली त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायच्या. मुळात नाटकातून ते पुढे आल्यामुळे प्रत्येक भूमिकेत ते स्वतःचा रंग भरायचे. ते गाण सुरेख म्हणायचेच पण त्या सोबत कोणत्याही वयातील व्यक्तीसोबत त्यांचे जमायचे. काळाबरोबर पुढे जाताना त्यांनी कायम नवनव्या गोष्टी आत्मसात केला. अगदी आत्तापर्यंत ते टेलिव्हिजन सीरियलमध्ये काम करत होते. मित्रांमध्ये तर ते अगदी 'यारों का यार' होते. अशा व्यक्तींचं जाणं कायमच हळहळ लावणारं असतं. काही दिवसांपूर्वी आम्ही एका वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात भेटलो होतो. आमच्या हातून सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार दिले होते. त्यावेळी ही आमची शेवटची भेट असेल असे मनातही आले नव्हते. त्यांचा उत्साह, उमदेपणा कधीच विसरला जाणार नाही.