रोडरोमिओंवर ‘दामिनीं’ची नजर
By admin | Published: September 10, 2016 12:55 AM2016-09-10T00:55:43+5:302016-09-10T00:55:43+5:30
गणेशोत्सवकाळामध्ये महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्या, तसेच त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या ६९ रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली
पुणे : गणेशोत्सवकाळामध्ये महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्या, तसेच त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या ६९ रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या दामिनी स्क्वाडच्या माध्यमातून गस्त वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
उत्सवकाळात महिलांची छेडछाड होणार नाही, टिंगलटवाळीच्या घटनांना आळा घालण्याच्या सक्त सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिल्या आहेत. महिलांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण होण्यासाठी बुधवार आणि गुरुवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये ६९ व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विश्रामबाग, फरासखाना, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा, खडकी, पिंपरी, निगडी, चिंचवड, स्वारगेट, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. दामिनी पथकांमार्फतही शहरात सर्वत्र गस्त सुरू आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालून या प्रकारांवर लक्ष ठेवत असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>गावठी पिस्तुल जप्त
येरवड्यातील आयबीएम कंपनीच्या पाठीमागील बाजूस कारवाई करीत पोलिसांनी सुमीत मनोहर कांबळे (वय २५, रा. गंज पेठ) याला पकडले आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले असून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉजची झाली तपासणी
गेल्या दोन दिवसांत संशयितरीत्या फिरताना आढळलेल्या ६ जणांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून देण्यात आले आहे. यासोबतच शहरातील तब्बल ३६ लॉज तपासण्यात आले असून ३९ गुन्हेगारांना तपासण्यात आले आहे. येरवड्यातील कोंबिंग आॅपरेशनदरम्यान मारहाणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आशुतोष सुभाष अडागळे, दीपक दत्तात्रय मदने या दोघांना पकडण्यात आले.