डम्पिंगमुळे श्वास गुदमरतोय, कन्नमवारनगर, टागोरनगर आणि कांजूरवासीय त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:00 AM2017-10-23T02:00:01+5:302017-10-23T02:00:23+5:30
मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असतानाच आता पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कुलदीप घायवट
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असतानाच आता पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील डम्पिंग ग्राउंडवर पुनर्प्रक्रिया न करता कचरा टाकला जात असून, कचºयाच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने कन्नमवारनगर, टागोरनगर आणि कांजूरमार्ग येथील रहिवाशांचा श्वास कोंडला आहे. परिणामी संतप्त रहिवाशांनी ‘डम्पिंग हटाओ’ ही मोहीम हाती घेतली असून, हा प्रश्न कायमचा निकाली लावला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
कांजूर डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील वेगवेगळ्या विभागांतून येणारा कचरा कांजूर डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे येथील आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हवेमार्फत सर्वदूर कचºयाची दुर्गंधी पसरली जाते. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचºयावर योग्य ती प्रक्रिया करून कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता कचरा टाकला जातो. त्यातून निर्माण होणाºया दूषित हवेमुळे कन्नमवारनगर, टागोरनगर, कांजूरमार्ग येथील नागरिकांना त्रास होऊन दूषित हवेमुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी निर्माण होते. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना श्वसन करण्यास त्रास होत आहे. अनेकांना दमा, खोकला यासारखे आजार झाले आहेत. तसेच या कचºयामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरवणाºया डासांची पैदास होते. त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळते, असे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्थानिक रहिवासी कांजूरमधील कचरा डेपोविरोधात लढा देत आहेत. नागरी वस्तीपासून काही मिनिटांच्या अंतरावर शहरातील सर्वांत मोठा कचरा डेपो सुरू करून महापालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते आश्वासन देत आहेत. पण यावर कोणतीही सकारात्मक ठोस पावले उचलली जात नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले. कचरा टाकताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणत्याही आदेशांचे पालन केले जात नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत ठेवून जगावे लागत आहे. ३ हजार टनपेक्षा जास्त कचरा कांजूर डम्पिंग येथे टाकण्यात येतो. त्यामुळे येथील कचºयाच्या ढिगाºयामुळे नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे.
>जगण्याच्या अधिकारावर गदा
भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकास स्वच्छ हवेमध्ये जगण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारानुसार येथील नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारावर गदा येत आहे. त्यामुळे विभागातील नागरिकांच्या वतीने प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की, सदर ग्राउंडवर असलेल्या व्यवस्थापनेवर महापालिकेने लक्ष द्यावे. अन्यथा आंदोलन छेडले जाईल.
- संजय गोपाळ येतवे,
अध्यक्ष, विक्रोळी विकास मंच
>तक्रार करायची कुठे?
कांजूरमार्र्ग येथील डम्पिंग ग्राउंडमधून उग्र दर्प येतो. रहिवाशांना आजाराचे त्रास होत आहेत. दिवाळीत याचा जास्त त्रास झाला. महापालिकेच्या तक्रार क्रमांकांवर संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे तक्रार करायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवाशांना श्वसनासह त्वचा आजाराचा त्रास होत आहे. कांजूर डम्पिंग ग्राउंडवर प्रक्रिया न करता कचरा टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. प्रशासनाने काही तरी कार्यवाही करावी ही अपेक्षा आहे.
- गणेश शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते