नृत्य आणि मी...
By admin | Published: July 17, 2016 12:43 AM2016-07-17T00:43:30+5:302016-07-17T00:43:30+5:30
‘एक अलबेला' मुंबईत काही कारणांमुळे फार दिवस नव्हता, पण 'सुलतान'सारखा मोठा सिनेमा असतानाही पुण्यामध्ये तो चक्क या आठवड्यातही आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. याबद्दल पुणेकरांना
- मंगेश देसाई
‘एक अलबेला' मुंबईत काही कारणांमुळे फार दिवस नव्हता, पण 'सुलतान'सारखा मोठा सिनेमा असतानाही पुण्यामध्ये तो चक्क या आठवड्यातही आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. याबद्दल पुणेकरांना धन्यवाद, पण जेवढ्याही प्रेक्षकांनी बघितला, त्यांना मी साकारलेले भगवानदादा म्हणजेच 'ते खरे भगवानदादा'असा नक्कीच भास झाला. अनेक एसएमएस, फोन मला आलेही. माझ्या नृत्याबद्दल फार लोकांनी स्तुती केली. ‘अगदी भगवानदादा सारखं नाचलात. काहीच फरक नाही,’ अशा अनेक प्रतिक्रिया मला आल्या. मी या प्रतिक्रिया ऐकताना मनापासून खूप हसायचो आणि आश्चर्यही वाटायचं. कारण हेच की, मी नृत्यामधे ‘ढ’ असणारा अचानकपणे भगवादादांसारखा नाचलोही आणि पसंतीची पावतीही मिळवली. हा सगळा विचार करत असताना मला माझा आणि शेखरसरांचा संवाद आठवला. मी सरांना पहिल्या भेटीतच म्हणालो होतो, ‘सर अभिनयाचं ठीक आहे. तो मी चांगलाच करीन, पण नृत्याचं काय? दादांचं नृत्य हा यूएसपी होता आणि माझा एलएसपीसी (लॉस्ट सेलिंग पॉइंट) आहे. तुम्ही एखादा चांगला नृत्य करणारा नट घ्या. आपण नंतर कधीतरी काम करू, पण मी दादांचा रोलही केला आणि नृत्यही. याचं सगळं श्रेय आमचा नृत्यदिग्दर्शक स्टॅनली आणि त्याचा असिस्टंट सदाला जातं.
दोघांनाही माझ्या नृत्यशैलीबद्दल पहिल्या मिनिटांतच समजलं होतं आणि त्यांनी मनाची तयारीही केली होती की, त्यांना खूप धाम गाळावा लागणार, पण दोघांचेही त्याबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच. मला कुठलाही कमीपणा न देता, त्यांनी माझी तयारी करून घेतली. आमची तालीम शूटच्या एक दिवस आधीच व्हायची, फार दिवसही नाही, पण शूट झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, ते आदल्या दिवशी फक्त बेसिक स्टेप्सवर माझ्याकडून काम करून घ्यायचे आणि शूटला फिनिशिंगवर जोार द्यायचे. माझ्याकडून फार सहज नृत्य करून घेणारे हे माझ्या आयुष्यातले पहिलेच नृत्यदिग्दर्शक, पण हे सगळं असलं तरीही मला नक्की वाटतं की, भगवानदादा साकारताना माझ्या आजूबाजूला ‘आत्मारूपी दादा’ वावरत होते. कारण हे तेवढे सोपे नव्हतेच. नृत्याला घाबरणारा मंगेश स्टॅनली, सदाचे उपकार कधीच विसरणार नाही. कारण आता मी प्रत्येक फिल्ममध्ये मला नृत्य आहे का? असे विचारायची हिंमत करू लागलो आहे.