मुंबईत रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये शांताबाई, रिक्षावाला गाण्यांवर डान्स
By admin | Published: May 11, 2016 12:02 PM2016-05-11T12:02:13+5:302016-05-11T12:51:03+5:30
मुंबईतील एका रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली नाचगाणी झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - हॉस्पिटल हे रुग्णावर उपचार करण्याचे ठिकाण. आजारी रुग्णाला त्रास होऊ नये म्हणून तिथे शांतता पाळली जाते. पण मुंबईतील एका रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली नाचगाणी झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
मुंबई मिररच्या वृत्तानुसार चेंबूरच्या दीवालीबेन मेहता हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये दोन मार्च रोजी हळदीकुंकू समारंभ झाला. यावेळी स्पीकर्सवर गाणी वाजवण्यात आली. त्यावर रुग्णलाच्या कर्मचारी त्यांच्या मुलांनी नृत्याचे कार्यक्रम सादर केले. मुंबई महापालिकेने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
रुग्णालयातील वीस पेक्षा जास्त महिला कर्मचारी, डॉक्टर, परिचारीका आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी चौकशीला सामोरे जात आहेत. कार्यक्रमानंतर काही दिवसांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला अज्ञात स्त्रोताकडून या कार्यक्रमाचा व्हिडीओ मिळाला. तक्रारदाराने केलेल्या आरोपानुसार दोन मार्चला पहिल्या मजल्यावरील ओपीडीमध्ये सकाळी दहावाजता कार्यक्रमाची तयारी सुरु झाली. कर्मचारी स्पीकर्सचा आवाज तपासत होते. नाश्ता आणि भिंतीची सजावट सुरु होती. दुपारनंतर ओपीडी डान्स फ्लोअरमध्ये बदलली. शांता बाई, रिक्षावाला या गाण्यांवर कर्मचा-यांनी ठेका धरला.
जे रुग्ण तपासणीसाठी आले होते त्यांना तळमजल्यावरील ओपीडीमध्ये पाठवण्यात आले. काहीजणांना दुस-या दिवशी या सांगण्यात आले. तक्रारदाराच्या आरोपानुसार कार्यक्रमाच्या दिवशी दोन ओपीडींमध्ये मिळून ३७७ रुग्ण तपासण्यात आले. इतर दिवशी आठशे रुग्ण तपासले जातात.