नामदेवांच्या रचनांवर रंगणार ‘नृत्यबानी’

By Admin | Published: March 8, 2015 01:14 AM2015-03-08T01:14:49+5:302015-03-08T01:14:49+5:30

संतसाहित्य, साहित्याचे भविष्य यावरील चर्चांबरोबरच कविसंमेलन आणि संत नामदेव यांच्या हिंदी रचनांवर आधारित ‘नृत्यबानी’ हा नृत्याविष्कार यांनी घुमान साहित्य संमेलन रंगणार आहे.

'Dance' will be painted on Namdev's composition | नामदेवांच्या रचनांवर रंगणार ‘नृत्यबानी’

नामदेवांच्या रचनांवर रंगणार ‘नृत्यबानी’

googlenewsNext

घुमान साहित्य संमेलन : परिसंवादांसह चर्चा, अभिरूप न्यायालय आणि कविसंमेलन
पुणे : संतसाहित्य, साहित्याचे भविष्य यावरील चर्चांबरोबरच कविसंमेलन आणि संत नामदेव यांच्या हिंदी रचनांवर आधारित ‘नृत्यबानी’ हा नृत्याविष्कार यांनी घुमान साहित्य संमेलन रंगणार आहे.
घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते शनिवारी जाहीर करण्यात आली. ‘संत साहित्य देव्हाऱ्यातच, व्यवहारात का नाही?’, ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि मुद्रित साहित्याचे भवितव्य’ या विषयांवर परिसंवाद, कविसंमेलन तसेच संत नामदेव यांच्या हिंदी रचनांवर आधारित ‘नृत्यबानी’ हा नृत्याविष्कार पाहावयास मिळणार आहे. पाकिस्तानातील फैज अहमद फैज यांच्या कन्या कवयित्री सलिमा हश्मी यांचा सत्कार एक आकर्षण असणार आहे.
संमेलन ३ ते ५ एप्रिल या कालावधीत होत असून, दि. ३ रोजी सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाने संमेलनाची सुरुवात होणार आहे. १० वाजता ग्रंथदिंडी निघणार असून, त्यात भक्त नामदेव ग्रंथदिंंडी नानक साई फाउंडेशन, नांदेड आणि कविवर्य नारायण सुमंत यांची कृषिदिंडी, मोडनिंब यांचा सहभाग असणार आहे. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक सूरजितसिंग पातर यांचा विशेष सहभाग असणार आहे.
दुपारी २.३० वाजता ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. पंजाबी साहित्य अकादमीचे अध्यक्ष गुरूभजनसिंग गिल उपस्थित असणार आहेत.
संमेलनाचा उद्घाटन सोहळा दुपारी ४ वाजता होणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल अध्यक्षस्थानी असतील. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी लेखक गुरुदयालसिंग प्रमुख पाहुणे असणार आहेत.
लेखक डॉ. प्रकाश रसाळ (औरंगाबाद) आणि साधना प्रकाशन (पुणे) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता साहित्य आणि ललितकला अनुबंध हा कार्यक्रम होणार असून, त्यात डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. स्वाती दैठणकर, अनुराधा कुबेर, श्याम भुतकर, राहुल घोरपडे, आणि स्रेहल दामले सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता ‘नृत्यबानी’ हा कार्यक्रम होत असून, यात ज्येष्ठ नर्तिका डॉ. स्वाती दैठणकर आणि नूपुर, क्षमा, वैष्णवी, तन्वी, अर्पिता आणि सहकारी सहभागी होणार आहेत. संगीत डॉ. धनंजय दैठणकर यांचे आहे. (प्रतिनिधी)

1संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी कवयित्री सलिमा हश्मी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कविकट्टाचे उद्घाटन फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ वाजता ‘संत साहित्य देव्हाऱ्यातच, व्यवहारात का नाही?’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.
2सकाळी ११ वाजता ‘दृक-श्राव्य माध्यमातील संहितालेखन’ या विषयावर अभिरूप न्यायालय भरविले जाणार आहे. दुपारी २.३० वाजता ‘भारतीय भाषांतील स्रेहबंध व अनुवाद’ हा कार्यक्रम होईल. याच वेळी ‘मला प्रभावित करणारे लेखन’ हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होत असून, फ. मुं. शिंदे अध्यक्ष असणार आहेत. यात २५ कवी सहभागी होणार आहेत.
3सायंकाळी ५.३० वाजता निकिता मोघे यांच्या पायलवृंदचे कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. यात फय्याज, अवधूत गुप्ते, उपेंद्र भट, मोहन जोशी, त्यागराज खाडीलकर, राहुल घोरपडे, सावनी रवींद्र, अनुराधा कुबेर, शर्वरी जमेनिस, अश्विनी एकबोटे, स्मिता तांबे, भार्गवी चिरमुले सहभागी होणार आहेत. सुबोध भावे आणि मृणाल कुलकर्णी सूत्रसंचालन करणार आहेत.
4संमेलनाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांच्या मुलाखतीने होणार आहे. ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि मुद्रित साहित्याचे भवितव्य’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी २.३० वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून, सूत्रसंचालन स्पृहा जोशी करणार आहे.
5सायंकाळी ४.३० वाजता संमेलनाचा समारोप होईल. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते काश्मिरी लेखक प्रो. रहमान राही, नवा जमानाचे संपादक जतिंदर पन्नू उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, सरहदचे संजय नहार, महामंडळाचे सुनील महाजन, प्रकाश पायगुडे यांनी नियोजनासंदर्भात माहिती दिली.

दूरदर्शनवरून प्रसारण व्हावे
घुमान येथे होत असलेल्या साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेचा राष्ट्रीय स्तरावर जागर होणार असल्याने मुंबई दूरदर्शन आणि आकाशवाणीने निदान संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप समारंभाचे थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी केली आहे. इतर दूरचित्र वाहिन्यांनी प्रक्षेपणासाठी हात पुढे केला आहे, पण सरकारी माध्यमे प्रसारणासाठी निधी मागत असल्याचे त्या म्हणाल्या. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
ठराव पाठवा
संमेलनाच्या व्यासपीठावर मांडण्यासाठी ज्या कुणा व्यक्तीला अथवा संस्थेला ठराव पाठवायचे असतील त्यांनी ते ठराव २७ मार्च पर्यंत साहित्य परिषदेच्या कार्यालयात पाठवावे, असे
आवाहन करण्यात आले
आहे. पुस्तक प्रदर्शनात किती प्रकाशक, विक्रेते सहभागी होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. प्रकाशक-विक्रेत्यांनी मांडलेल्या मुद्द्यांसंदर्भात महामंडळाच्या
बैठकीत चर्चा झाली असून, त्यास तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. समन्वय समिती पुढच्या संमेलनापासून अस्तित्वात येईल.

Web Title: 'Dance' will be painted on Namdev's composition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.