नाचता येईना.. अंगण वाकडं !

By Admin | Published: January 20, 2017 12:16 AM2017-01-20T00:16:29+5:302017-01-20T00:16:29+5:30

मुलांनोऽऽ, आज तुम्हाला काही म्हणी शिकवतो. घ्या पटापटा लिहून.

Dancing can not be done! | नाचता येईना.. अंगण वाकडं !

नाचता येईना.. अंगण वाकडं !

googlenewsNext


(स्थळ : गावाबाहेरच्या शाळेत गुरुजी म्हणींचा अभ्यास घेण्यात मग्न.. तर वर्गाबाहेर पारावर बसलेले कार्यकर्ते पेपरातल्या राजकीय बातम्या जोरजोरात वाचण्यात दंग.)
गुरुजी : मुलांनोऽऽ, आज तुम्हाला काही म्हणी शिकवतो. घ्या पटापटा लिहून.
कार्यकर्ते : (मथळे वाचत) नाशिकमध्ये कॉँग्रेस आघाडीची म्हैस पाण्यातच !
गुरुजी : बैल गेला अन् झोपा केला.
कार्यकर्ते: ‘महायुतीचा धर्म पाळा, अन्यथा स्वबळावर लढणार !’ - इति विनायक मेटे अन राजू शेट्टी.
गुरुजी : नागोबा-म्हसोबा पैशाला दोन. पंंचमी झाल्यावर पुजतंय कोण ?
कार्यकर्ते : निवडणुकीत नोटाबंदीचा सत्ताधाऱ्यांना त्रासदायक ठरणार !
गुरुजी : ऐन दिवाळीत दाढदुखी !
कार्यकर्ते : भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटेना.
गुरुजी : तुझं माझं जमेना... तुझ्या वाचून करमेना.
कार्यकर्ते : ‘आघाडी’च्या बिघाडीचा खरा केंद्रबिंदू साताऱ्यातच. - सुनिल तटकरे यांचा पृथ्वीराज चव्हाण यांना टोला.
गुरुजी : नाचता येईना.. अंगण
वाकडं !
कार्यकर्ते : राज ठाकरे यांची घोषणा, ‘युतीसाठी कुणाचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू.’
गुरुजी : तेल गेलं, तूप गेलं..हाती धुपाटणे आलं !
कार्यकर्ते : अजितदादा पवार यांचा गंभीर आरोप, ‘भाजप सध्या गुंडांचा पक्ष बनलाय!’
गुरुजी : सौ चुहे खा के बिल्ली...
वर्गातली मुलं : पण गुरुजी.. ही म्हण नेमकी कुणासाठी ?
गुरुजी : दोघांसाठीही ! म्हणजे उंदीर अन् मांजरासाठी..
कार्यकर्र्ते : भाजपमध्ये ‘इनकमिंग’ वाढल्याने युतीसाठी इच्छुक असलेल्या शिवसैनिकांची कोंडी.
गुरुजी : करायला गेले नवस अन् आज निघाली अवस !
कार्यकर्ते : निवडणूक आयोगाच्या फतव्यानुसार प्रचारातला नाष्ट्याचा दर म्हणे केवळ पंधरा रुपये. इच्छुक उमेदवार हैराण.
गुरुजी : तोंड दाबून बुक्क्याचा मार!
कार्यकर्र्ते : ‘मुंबईत भावी महापौर कुणाचा?’ यावरून भाजप-शिवसेनेत संघर्ष.
गुरुजी : बाजारात तुरी अन् ७७ ७७७ ला मारी!
कार्यकर्ते : ‘महायुती’तल्या इतर घटक पक्षांनाही म्हणे निवडणुकीत भरपूर जागा हव्यात.
(एवढ्यात गुरुजींना ठसका लागतो. ते पाणी पिऊ लागतात. तोपर्यंत मुलंच पुढची अस्सल गावरान म्हण सांगतात.)
वर्गातली मुलं : (एकसुरात) पायलीची सामसूमअन् चिपट्याची धामधूम.
- सचिन जवळकोटे

Web Title: Dancing can not be done!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.