दिंडी चालली पुढे ...
By Admin | Published: February 5, 2017 01:18 AM2017-02-05T01:18:56+5:302017-02-05T01:18:56+5:30
हे संमेलन तर झालं. पावसाला पूर येतो, तेव्हा गाळ अणि राळ निघून जातो आणि राहते ते निर्मळ पाणी. समेलनाचं यश-अपयश मोजण्याच्या प्रत्येकाच्या पट्ट्या वेगळ््या असतील.
- रविप्रकाश कुलकर्णी
हे संमेलन तर झालं. पावसाला पूर येतो, तेव्हा गाळ अणि राळ निघून जातो आणि राहते ते निर्मळ पाणी. समेलनाचं यश-अपयश मोजण्याच्या प्रत्येकाच्या पट्ट्या वेगळ््या असतील. ज्यांनी त्यांनी ते बघावं. अरे हो, अता पुढचं संमेलन आलचं की? पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. संमेलनाचा इतिहास तरी तेच सांगतो.
होणार होणार असा गेले काही दिवस जो गाजावाजा होत होता ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज रविवार म्हणजे ५ फेब्रुवारी २०१७ रोजी अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे.
एरवीदेखील डोंबिवली नगरी या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतेच. मात्र इथे भरलेल्या ९० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाने ती आणखी प्रकाशझोतात आली आहे. ही किमया अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची हे निर्विवाद. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची गोष्टच वेगळी. ज्याचे पडसाद मराठी सांस्कृतिक जगतात ठळकपणे जाणवतात, विशेष म्हणजे ही परंपरा अखंडपणे गेली काही वर्षे चालू आहे आणि पुढेही चालू राहील असं दिसत आहे. याचं कारण म्हणजे साहित्य संमेलनाच्या सांगता दिवशी पुढचं साहित्य संमेलन ‘आम्हाला द्या’ असा पुढाकार घेणारे दिसतात. यंदा तर त्याच्या आधीच पुढचं संमेलन आम्ही भरवू सांगणारे भेटले.
साहित्याची दिंडी ही अशीच पुढे जाणार आहे. त्याचीच ही खूण आहे. साहित्याच्या नावाने तीन दिवस वेगवेगळे आणि वेगवेगळ्या ठिकाणची माणसं एकत्र येतात. कमी-जास्त विचारविनिमय करतात ही गोष्ट आश्वासक वाटते. आज त्याची गरज आहे. हे पुन्हा डोंबिवलीच्या उदाहरणाने दाखवून दिलेलं आहे.
या वेळचं संमेलन आगरी युथ फोरमच्या पुढाकाराने भरलं आहे, हेदेखील त्याचं वेगळेपण आहेच. शेवटी साहित्यातदेखील समाजातील वेगवेगळ्या थरातील मराठी स्तरातील लोकांचा सहभाग वाढला पाहिजे, त्याचीच ही सुरुवात आहे, असं म्हटलं तर चुक ीचं ठरू नये!
सुरुवातीला काही कुरबुरीदेखील झाल्या. पण आता या गोष्टीदेखील अपरिहार्यच समजायच्या का कुणास ठाऊक?
महाराष्ट्र धर्माचंच हे अंग म्हणावं काय? एकेकाळचे खंदे कार्यकर्ते, समीक्षक, लेखक भीमराव कुलकर्णी यांनी हे मार्मिकपणे नमूद करून ठेवलं आहे. ते म्हणतात, महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हो, असं मला विचारल्यास मी ‘मराठी परिषद आणि मराठी साहित्य संमेलनं’ असं चटकन सांगून टाकतो. संकटाने स्फुरण येतं, संघटनात्मक कार्य करायची खुमखुमी असतानाही कटकटी, कलागती, झोंबाझोंबी, कायद्याचा, घटनेचा कीस काढून, तावून सुलाखून निघाल्यानंतर संमेलनाच्या धुमधडाक्यात स्वत:ला झोकून देणं आणि तेथेही वेगवेगळ्या अंगाने आपल्यावरील गुणांचं प्रदर्शन करून झाल्यानंतर मग संमेलनाच्या यशस्वितेची चर्चा करून पुन्हा वाद उकरून काढणं...
ही सारी साहित्य संमेलनाची वैशिष्ट्यं... म्हणजेच महाराष्ट्र धर्म
या गोष्टीला आता तीसएक वर्षं झाली असती. पण या निरीक्षणात काहीही बदल करावासा वाटत नाही. बदल असलाच तर त्यात गडद रंगाचीच भर पडते.
या सगळ्या गोष्टी गृहीत धरूनसुद्धा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची दिंडी अव्याहत चालू आहे आणि चालू राहणार आहे. हे वेळोवेळी भरलेल्या संमेलनाने दाखवून दिलं आहे. डोंबिवली येथे भरलेल्या संमेलनाने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेलं आहे!
गेले काही दिवस डोंबिवलीतील कार्यकर्ते हे संमेलन व्हावं - यशस्वी व्हावं यासाठी झटत आहेत. शेवटी असल्या निरलस कार्यकर्त्यांमुळेच कार्यसिद्धी होत असते. याची जाण आजच्या संमेलनाच्या सांगतेवेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष, गुलाबराव वझे यांना आहे आणि त्याचा पुनरुच्चार ते करणारच हे वेगळे सांगायला नको.
असल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच दिंडीबरोबर चालण्याचं बळ मिळत असतं. या दिंडीत आपल्यालाही सामील होता आलं हे समाधान पुढच्या वाटचालीत बळ देत असतं. संमेलनात एवढं झालं तरी पुष्कळ.
म्हणूनच साहित्य संमेलनं व्हायला हवीत. हे डोंबिवलीत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या सांगतेवेळी जाणवणार आहे, हेही नसे थोडके.