दत्तगुरूमधील रहिवाशांचा जीव टांगणीला

By admin | Published: January 7, 2017 02:40 AM2017-01-07T02:40:53+5:302017-01-07T02:40:53+5:30

नेरूळमधील दत्तगुरू गृहनिर्माण सोसायटीमधील दोन्ही इमारती अतिधोकादायक झाल्या आहेत.

Dangatguru residents live on the ground | दत्तगुरूमधील रहिवाशांचा जीव टांगणीला

दत्तगुरूमधील रहिवाशांचा जीव टांगणीला

Next

नामदेव मोरे,

नवी मुंबई- नेरूळमधील दत्तगुरू गृहनिर्माण सोसायटीमधील दोन्ही इमारती अतिधोकादायक झाल्या आहेत. जीव मुठीत घेऊन रहिवासी वास्तव्य करत आहेत. गुरुवारी जिना खचल्याने रहिवाशांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. महापालिका व सिडकोकडून पुनर्बांधणीसाठीच्या परवानग्या मिळत नसल्याने १३६ कुटुंबीयांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
नवी मुंबईमधील १८७ गृहनिर्माण सोसायट्या व व्यापारी संकुल धोकादायक घोषित करण्यात आली आहेत. जवळपास ३ हजारपेक्षा जास्त इमारती धोकादायकच्या यादीमध्ये आहेत. यामधील अतिधोकादायक बांधकामांमध्ये नेरूळ सेक्टर ६ मधील दत्तगुरू गृहनिर्माण सोसायटीचा समावेश आहे. सिडकोने केलेल्या निकृष्ठ कामांमुळे २० वर्षांमध्येच बांधकाम धोकादायक झाले आहे. येथील दोन इमारतींमध्ये एकूण १३६ कुटुंब वास्तव्य करत आहेत. जवळपास २००९पासून पुनर्बांधणीसाठी परवानगी मिळावी, यासाठी रहिवाशांनी पाठपुरावा सुरू केला आहे. इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने रहिवाशांनी तिचा वापर बंद केला होता; पण सिडको व पालिका प्रशासनाने पुनर्बांधणीसाठीच्या परवानग्या वेळेत दिल्या नाहीत. बाहेर घर भाडेतत्त्वावर घेणे परवडत नसल्याने नागरिकांनी पुन्हा धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका प्रशासनाने रहिवाशांना इमारतीचा वापर थांबविण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी तगादा लावला आहे. घरे खाली करण्यामागे नागरिकांच्या सुरक्षेचा विषय नसून, अपघात झाल्यास स्वत:चा बचाव करण्यासाठी पालिकेने नोटीसची औपचारिकता केली आहे. अतिधोकादायक इमारतींमध्ये राहण्याची आमचीही इच्छा नाही. आम्हाला आमच्या व परिवारातील सर्व सदस्यांच्या जीवाची काळजी आहे. महापालिकेने पुनर्बांधणीसाठी तत्काळ परवानगी दिली, तर आम्ही तातडीने घरे खाली करू शकतो, असे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे.
पुनर्बांधणीला परवानगी मिळावी, यासाठी रहिवाशांनी पालिका व सिडकोच्या कार्यालयामध्ये शेकडो हेलपाटे घातले आहेत; परंतु आश्वासनाशिवाय दुसरे काहीही प्राप्त होत नाही. सिडकोने सोसायटीच्या बाजूला असलेला ३९४ मीटरचा भूखंड रहिवाशांना दिला आहे; पण त्यासाठीचा अंतिम करार अद्याप झालेला नाही. महापालिकेचे नगररचनाकार किशोर आग्रहारकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक सुनील हजारे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांपैकी एक सुट्टीवरच असल्याने नगररचना विभागाकडून बांधकाम परवानग्या देण्याचे काम जवळपास ठप्प झाले आहे. पुनर्बांधणीच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास दिरंगाई होत आहे. दत्तगुरू गृहनिर्माण सोसायटीमध्ये वारंवार स्लॅब कोसळणे व इतर घटना घडत आहेत. इमारतीचा पिलरही खचला आहे. अशा स्थितीमध्ये वेळेत परवानगी दिली नाही, तर इमारत कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
>नियम पाळणाऱ्यांवर अन्याय
नवी मुंबईमध्ये ५० हजारपेक्षा जास्त अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या असून, शासनाने २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिका प्रशासनानेही सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत नळजोडण्या देण्याचे काम सुरू केले आहे. सिडको, एमआयडीसी व महसूल विभागाच्या शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व कोणत्याच नियमांचे पालन न करणाऱ्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत. अनधिकृत घरे नियमित केली जात आहेत. दुसरीकडे ज्यांनी कर्ज काढून घरे विकत घेतली त्या प्रामाणिक, कष्टकरी व सर्व नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांना किरकोळ त्रुटींमुळे पुनर्बांधणीची परवानगी वेळेवर दिली जात नाही.
>आम्हाला फक्त
बांधकाम परवानगी द्या
महापालिकेला इमारतीच्या स्थितीविषयी कळविले, तर ते लगेच इमारत खाली करण्याची धमकी देत आहेत. घरे खाली करून जायच्या सूचना दिल्या जात आहेत; पण घरे खाली करून कुठे जायचे? याचे उत्तर दिले जात नाही. पालिकेने आम्हाला फक्त बांधकाम परवानगी द्यावी, आम्ही तत्काळ घरे खाली करून जाऊ अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली आहे. दत्तगुरू सोसायटीपासून पुनर्बांधणीची सुरुवात व्हावी, असे मतही रहिवाशांनी व्यक्त केले आहे.
>काळजाचा ठोका चुकला
गुरुवारी दत्तगुरू गृहनिर्माण सोसायटीचा जिना खचला. दोन पायऱ्यांचे पूर्ण स्लॅब व लोखंड गळून खाली पडले. सुदैवाने तेव्हा जिन्यावरून कोणीही जात नव्हते. या घटनेमुळे रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. इमारत पडण्याची भीती वाटत असून, ती पडण्यापूर्वी पालिकेने बांधकाम परवानगी द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Web Title: Dangatguru residents live on the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.